लाचखोर राजेंद्र शिर्के अखेर निलंबित
By admin | Published: May 3, 2017 02:32 AM2017-05-03T02:32:02+5:302017-05-03T02:32:02+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे लाचखोर स्वीय सहायक व लघुलेखक राजेंद्र सोपान शिर्के (वय ४५, रा. संध्यानगरी जगताप डेअरी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचे लाचखोर स्वीय सहायक व लघुलेखक राजेंद्र सोपान शिर्के (वय ४५, रा. संध्यानगरी जगताप डेअरी, पिंपळे-गुरव) यांच्यावर मंगळवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच त्याची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका भवनात चौथ्या मजल्यावर आयुक्त दिनेश वाघमारे यांचे कार्यालय आहे. त्यांच्या दालनाबाहेरच स्वीय सहायक शिर्के यांचे कार्यालय आहे. इमारतींचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी शिर्के याने थेरगाव येथील बांधकाम व्यावसायिकाला बारा लाख रुपयांची लाच मागितली होती. याबाबत बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाक (एसीबीकडे) तक्रार दिली होती. दरम्यान, आयुक्त दिनेश वाघमारे यांना पदोन्नती मिळाली. शेवटच्या दिवशी २४ एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिकाकडून बारा लाख रुपयांची लाच घेतना शिर्के याला लाचलुचपत प्रतिबंध पथकाने महापालिका मुख्यालयाच्या आवारातच रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर पोलीस कोठडीही देण्यात आली होती. याप्रकरणाने प्रशासनात खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)
महापालिकेतील अधिकाऱ्यांचे दणाणले धाबे
शिर्के हा गेल्या पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत होता. त्यांच्याविषयी लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी, अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिकांनी तक्रारी केल्या होत्या. आयुक्त वाघमारेंची बदली होण्याच्या शेवटच्या दिवशी शिर्केला रंगेहात पकडले. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार स्वीय सहायक राजेंद्र शिर्के यांना अटकेच्या दिनांकापासून निलंबित केले आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.