चक्रेश्वर मंदिराकडे जाणारा पूल खचला
By admin | Published: February 20, 2017 02:16 AM2017-02-20T02:16:22+5:302017-02-20T02:16:22+5:30
येथील बलुत आळीकडून चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावरील पूल रहदारीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलाजवळील रस्त्यालगतचा भाग खचल्याने
पुणे : चाकण (ता. खेड) येथील बलुत आळीकडून चक्रेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या ओढ्यावरील पूल रहदारीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पुलाजवळील रस्त्यालगतचा भाग खचल्याने हा पूलच ढासळण्याच्या अवस्थेत आहे. या पुलाच्या बाजूपट्ट्या खचत चालल्याने धोकादायक ठरत आहेत.
पुलावर संपूर्णपणे नवीन लोखंडी संरक्षक कठडे बसविण्याची आणि पुलाजवळील खचलेल्या भागात भराव टाकण्याची गरज निर्माण झाली आहे. हा पूल रहदारीला धोकादायक असल्याने पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
चर्मकारवस्तीपासून पुढे ओढ्यावरील पुलावरून जाणारा रस्ता चाकण चक्रेश्वर रस्त्याला जोडला जातो. हाच रस्ता पुढे चाकण-शिक्रापूर रस्त्यावर जाण्यास सोयीचा असल्याने या पुलावरून अनेक वाहनांची वर्दळ असते. पूल अरुंद असून त्यावरील संरक्षक लोखंडी पाइप तुटलेले आहेत. या रस्त्यावरील संबंधित पुलाजवळ नागमोडी वळण आहे.
धक्कादायक म्हणजे पुलालगतच्या भागात सिमेंट रस्त्याच्या दोन्ही बाजूचा भाग खचला आहे. त्यामुळे सिमेंटचा रस्ता खालून पोकळ झाला आहे. त्यातच मोठ्या वाहनांच्या रहदारीने पूलसुद्धा खचत चालला आहे. रात्रीच्या वेळी या धोकादायक भागाचा अंदाजच येत नाही. त्यामुळे येथून एखादे वाहन खाली ओढ्यात कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या रस्त्यावरील धोकादायक नागमोडी वळण काढून संपूर्णपणे नवीन पूल बांधण्यासाठी नगर परिषदेने प्रयत्न करण्याची मागणीही परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
नागरिकांत नाराजी
या पुलावरून विद्यार्थी, नोकरदार, चक्रेश्वर मंदिराकडे जाणारे भाविक आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या अंत्ययात्रा यांची नेहमी वर्दळ असते. संबंधित पुलाच्या दुरुस्तीची मागणी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. चाकण नगर परिषदेने लक्ष देऊन पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील रहिवासी व यंग जॉली क्लब मंडळाचे संतोष वाव्हळ, राजेंद्र जगनाडे यांनी केली आहे.