पाच वर्षांपासून रखडलेल्या पुलाच्या कामाला आला वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 01:31 AM2019-03-22T01:31:21+5:302019-03-22T01:31:33+5:30
गेल्या पाच वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका रस्त्यावरील रखडलेल्या पुलाचे काम प्रशासनाने पुन्हा सुरू केले.
- अतुल क्षीरसागर
रावेत - गेल्या पाच वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात रावेत ते चिंचवड जुना जकात नाका रस्त्यावरील रखडलेल्या पुलाचे काम प्रशासनाने पुन्हा सुरू केले़ वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतच्या जागेचे संपादन झालेले नाही. रस्त्याला बाधित ठरणारी घरे एक वर्षांपूर्वी जमीनदोस्त करून रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा ताब्यात घेऊन अर्धवट रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
चिंचवड जकात नाका ते रावेत हा रस्ता वाल्हेकरवाडीमधून जात असून, या रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत होते. त्या हा रस्ता चिंचवड जुना जकात नाका येथून सुरुवात होऊन पुढे रावेत प्राधिकरणाला मिळतो़ पुणे-मुंबई जाणाऱ्या लोकांसाठी सोईस्कर मार्ग आहे़ या रस्त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे़ या रस्त्याचे काम जवळपास सात वर्षांपासून सुरु आहे़ नवनगर विकास प्राधिकरणातील हद्दीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन ३१ डिसेंबर २०१४ रोजी पूर्ण झाले़ तेथून पुढील रस्त्यासाठी आवश्यक असणारे भूसंपादन महापालिकेकडून न झाल्यामुळे हा रस्ता अर्धवट अवस्थेत होता. या रस्त्याचा पूर्ण खर्च महानगरपालिका करणार होती; पण त्याची काही हद्द प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्यामुळे हा रस्ता प्राधिकरणाकडे सोपविण्यात आला. या रस्त्याची पूर्ण लांबी ३.१५ किमी व रुंदी ३४.५ मी. असून प्राधिकरणाच्या हद्दीतील २.६३ किमी लांबी आणि अर्धा पूल बांधून पूर्ण झाले असून, महानगरपालिकेच्या हद्दीतील वाल्हेकरवाडी येथील सुमारे ४०० मीटर पेक्षा जास्त जागेच्या भूसंपादनाचे काम अपूर्ण राहिले होते. त्यामुळे हा रस्ता खुला करण्यात आला नाही.
रस्त्यासाठी जवळपास ३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत सुमारे १७ ते १८ कोटी रुपये खर्च झाला आहे. प्राधिकरणाच्या हद्दीतील रस्ता पूर्ण झाला असून, तो वापरण्यायोग्य आहे असेही जाहीर करण्यात आले आहे व प्राधिकरणाची जबाबदारी त्यांनी पार पडली आहे. आता पालिकेच्या जबाबदारी असल्यामुळे त्यांच्याकडून काम होण्याची प्रतीक्षा नागरिकांना लागून राहिली होती. विकास आराखड्यानुसार रावेत ते चिंचवड जकात नाका मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाण ते नाल्यापर्यंतचा भाग नवनगर प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो या मार्गावरील २०० मीटर जागेचा ताबा अद्यापही प्रशासनाकडे नाही.
सब-वेचे काम प्रगतिपथावर
या रस्त्यालगत असणाऱ्या एकवीरा कॉलनी, शिवतीर्थ कॉलनी, नंदनवन या कॉलनीतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी येथे निर्माण होत असलेल्या पुलाखाली सब-वेची निर्मिती करण्यात येत आहे़ त्याचे काम प्रगतिपथावर आहे़ हा सब-वे पूर्ण झाल्यानंतर येथील रहिवाशांना रावेत आणि अन्य ठिकाणी ये-जा करण्यासाठी उपयोग होणार आह़े
मागील अनेक वर्षांपासून परिसराचा महापालिकेत समावेश करण्यात आला होता़ परंतु परिसराचा म्हणावा तसा विकास झाला नव्हता़ आत्ता कोठे विकासाच्या दृष्टीने सुरुवात झाली आहे़ प्रशस्त रस्त्यांची निर्मिती होत असल्याने विकासाच्या दृष्टीने अनेक वर्षे मागास राहिलेला भाग आता विकसित होत आहे. महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरणाच्या वादात रस्त्याचे काम रखडल्यामुळे परत परिसर विकासापासून वंचित राहतो की काय असा प्रश्न नागरिकांच्या समोर होता़ परंतु आता मात्र तो प्रश्न सुटला आहे. - विनोद राठोड, सामाजिक कार्यकर्ते
विकासाची गंगा परिसरात येत असताना प्रशस्त रस्त्यांमुळे परिसराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे़ परिसरात अनेक नामवंत शिक्षणिक संस्था आहेत़ त्यातच चांगल्या सुविधा प्रशासनाच्या वतीने पुरवत असताना हद्दीचा वाद महापालिका प्रशासन आणि प्राधिकरण प्रशासनाने आपापसात सोडवल्यामुळे अर्धवट अवस्थेत असणारे रस्त्याचे काम मार्गी लागत आहे.
- आबा वाल्हेकर,
अध्यक्ष, एकवीरा सेवा संघ