पिंपरीत आढळला ब्रिटिशकालीन बॉम्ब; परिसरात नागरिकांची उडाली तारांबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 04:50 PM2021-08-09T16:50:14+5:302021-08-09T16:50:23+5:30
पिंपरी पोलीस तसेच बॉम्ब शोधक नाशक पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले
पिंपरी : सोसायटीच्या अंतर्गत रस्त्याचे तसेच इतर काम सुरू असताना ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळून आला. पिंपरी येथील क्रोमा सेंटरजवळील कोहीनूर सोसायटी येथे सोमवारी (दि. ९) सकाळी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील कोहिनूर टॉवर ही सोसायटी आहे. सोसायटी जवळ सोमवारी सकाळी काम सुरू होते. त्यावेळी बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत संशय आला. ही वस्तू ब्रिटिशकालीन बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पिंपरी पोलीस तसेच बॉम्ब शोधक नाशक पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यानंतर जेसीबीच्या बकेटमध्ये वाळूची पोती टाकून त्यात बॉम्ब सदृश वस्तू ठेऊन पुढील तपासणीसाठी नेण्यात आली आहे.
यापूर्वी देखील अशा प्रकारचे ब्रिटिशकालीन बॉम्ब पिंपरी परिसरात सापडले आहेत. हे बॉम्ब अनेक वर्षांपासून जमिनीवर पडलेले असून ते खोदकामाच्या वेळी उघडकीस येत आहेत. संरक्षण विभागाकडे बॉम्ब देण्यात आला असून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.