बहिणीला कंपनीत सोडण्यासाठी गेलेल्या भावाचा टँकरखाली चिरडून मृत्यू, हिंजवडीतील घटना
By नारायण बडगुजर | Published: July 6, 2024 04:42 PM2024-07-06T16:42:33+5:302024-07-06T16:45:01+5:30
लक्ष्मी चौकात सिग्नल असल्याने ते थांबले होते. त्यावेळी समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली...
पिंपरी : भरधाव दुचाकीने सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुण खाली पडला. त्यावेळी त्याच्या पोटावरून टँकरचे चाक जाऊन त्याचा मृत्यू झाला. हिंजवडी येथे लक्ष्मी चौकात शुक्रवारी (दि. ५) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
करण कालिदास जाधव (वय २३), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. क्रांती कालीदास जाधव (२१, रा. हिंजवडी गावठाण) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दुचाकीवरील अज्ञात चालक आणि मातोश्री वाॅटर सप्लायर्स असे लिहिलेल्या टँकरच्या अज्ञात चालकाच्या विरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (भा. न्या. सं.) २०२३ चे कलम २८१, १२५ ए, १२५ बी, १०६ (१), ३२४ (४), मोटार वाहन कायदा कलम १८४, १३२ (१) (क), १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क्रांती यांचा भाऊ करण हा दुचाकीवरून क्रांती यांना मारुंजी येथील कंपनीमध्ये सोडण्यासाठी जात होता. लक्ष्मी चौकात सिग्नल असल्याने ते थांबले होते. त्यावेळी समोरून आलेल्या भरधाव दुचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात फिर्यादी क्रांती आणि त्यांचा भाऊ करण हे दोघेही त्यांच्या दुचाकीवरून खाली पडले. यात क्रांती यांना दुखापत झाली. तसेच गाडीचे नुकसान झाले. दरम्यान, क्रांती आणि त्यांचा भाऊ करण हे दोघेही रस्त्यावर पडले असताना त्यांच्या मागून आलेला मातोश्री वाॅटर सप्लायर्स असे लिहिलेला टँकर आला. टँकर चालकाने भरधाव टँकर चालवून करण याच्या पोटावरून टँकरचे चाक घातले. यात गंभीर जखमी झाल्याने करण याचा मृत्यू झाला. तसेच संशयित चालक अपघातस्थळी न थांबता पळून गेला.