भाईगिरी, गुंडगिरीचे लोण महाविद्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:41 AM2018-03-15T01:41:48+5:302018-03-15T01:41:48+5:30

अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर दोन विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातच कोयत्याने वार केले. ही सोमवारी सकाळी चिंचवडगावात घडलेली घटना ताजी असताना, सोमवारी रात्री पूर्णानगरमध्ये राहणा-या वेदांत भोसले या दहावीत शिकणा-या विद्यार्थ्यांच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे.

Brotherhood, bullying in bulk college | भाईगिरी, गुंडगिरीचे लोण महाविद्यालयात

भाईगिरी, गुंडगिरीचे लोण महाविद्यालयात

Next

संजय माने
पिंपरी : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर दोन विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातच कोयत्याने वार केले. ही सोमवारी सकाळी चिंचवडगावात घडलेली घटना ताजी असताना, सोमवारी रात्री पूर्णानगरमध्ये राहणा-या वेदांत भोसले या दहावीत शिकणा-या विद्यार्थ्यांच्या खुनाची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे शहरातील भाईगिरी, गुंडागिरीचे लोण आता शाळा व महाविद्यालयापर्यंत पोहोचले आहे.
राज्यात नागपूरनंतर पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीच्या घटनांचा आलेख वाढत आहे. उद्योगनगरीतील वाढत्या गुन्हेगारीचा प्रभाव सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचत आहे. त्यामुळेच चिंचवडगाव येथील जैन फत्तेचंद विद्यालयात सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास रूपेश गायकवाड या विद्यार्थ्यावर दोन अल्पवयीन मुलांनी कोयत्याने वार केले. किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाला हिंसक वळण मिळाले. शाळेच्या आवारात जाऊन रूपेशवर हल्ला करण्यात आला.
लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, असे म्हटले जाते. असेच काहीसे शहरात घडू लागले आहे. शहरात चौका चौकांत झळकणाºया जाहिरात फलकांवर वाढदिवसाचे औचित्य साधून गुंडांची छबी झळकलेली असते़ व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सोशल मीडियावर गुंडांचे उदात्तीकरण करणारे मेसेज धडकत असतात. यूट्यूबवर गुंडांच्या टोळ्यांचे संवाद असलेल्या चित्रफिती व्हायरल केल्या जातात. याचा प्रभाव पडल्याने अल्पवयीन मुलांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाले आहेत. ही मुले गुंडांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यातून हिंसक घटना घडू लागल्या आहेत, हे वास्तव आहे. अशा घटना घडू नयेत, यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
मुले मोबाइलवर कोणाशी
चॅटिंग करतात, नेमके चॅटिंग
काय करतात. त्यांचा कोणाशी
संबंध आहे, त्यांचे ग्रुप कोणते आहेत? याची पालकांनी खातरजमा करून घेतल्यास पालकांना मुलांवर लक्ष देता येईल. अशा प्रकारांवर नियंत्रण आणणे शक्य होईल.
तुझी व्हिकेट काढतो...
‘‘आमच्या मित्राला नडतोस, तुझी व्हिकेटच काढतो’’. अशा शब्दांत धमकावत दोन मुलांनी रूपेशवर कोयत्याचे वार केले. या घटनेला २४ तासांचा अवधी उलटला नाही तोच, रात्री १२ वाजता पूर्णानगर येथील एका गृहसंस्थेजवळ वेदांत भोसले या दहावीत शिकणाºया विद्यार्थ्याचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेतले. वेदांत ज्या मैत्रिणीबरोबर अभ्यासाला गेला होता, त्या मुलीवर एकतर्फी प्रेम असणाºया आरोपीने वेदांतला चाकूने भोसकले. दहावीची परीक्षा देत असलेल्या वेदांतला जीव गमवावा लागला. या दोन्ही घटनांनी शहर हादरून गेले आहे. पालक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मानसिकतेत बदल
सोशल मीडियाचा वापर यामुळे मुलांच्या मानसिकतेत अमूलाग्र बदल होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. दहावीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या मुलांचे निखळ मैत्रीचे वय असते. शाळेत शिकणारी मुले, मुली एकत्रित वावरणार, एकत्रित अभ्यास करणार याबद्दल काही शंका मनात येण्याचे कारण नाही. एकत्रित वावरणारे, एकमेकांचे मित्र असणारेच एकमेकांचा जीव घेण्याचा विचार करतात, ही मनोविकृती वाढीस लागणे घातक ठरू लागले आहे.
विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन
चिंचवड येथील एका महाविद्यालयात शिकणाºया आदित्य सुमित जैद (वय १८) या महाविद्यालयीन तरुणाचा असाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी खून केल्याची घटना सहा महिन्यांपूर्वी घडली आहे. पोलीस हवालदार पदावर सेवेत असलेल्या एका कर्मचारी महिलेच्या मुलाचा असाच बळी गेला. विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात अशी हिंसक वृत्ती बळावण्याचे प्रमाण वाढले आहे. या वयात प्रेमप्रकरणात अडकणे, किरकोळ भांडण होणे अशा घटना घडणे स्वभाविक आहे. परंतु त्याला हिंसाचाराचे स्वरूप प्राप्त होत आहे, ही बाब गंभीर मानली जात आहे. महाविद्यालयीन स्तरावर शिकणाºया विद्यार्थ्यांमध्ये प्रेमप्रकरणात अडकले जाण्याची शक्यता असते, परंतु शालेय स्तरावर शिकणाºया विद्यार्थ्यांमध्ये असे प्रकार घडण्यामागे बदलती परिस्थिती कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन आले.
माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी पौगंडावस्थेतून जात असतात. काहींचा बालपणापासूनच हट्टी, करारी स्वभाव असतो. संयमाचा अभाव असतो. त्यातच नकारात्मकता पचविण्याची त्यांची तयारी नसते. अशा वृत्तीच्या मुलांना वेळीच समुपदेशन करणे गरजेचे असते. एखादी गोष्ट आपल्यालाच मिळावी, या भावनेतून त्यांच्याकडून हिंसक कृत्य घडू शकते. ताणतणाव आणि वाढत्या वयाबरोबर मुलांमध्ये होणारे मानसिक बदल लक्षात घेतले पाहिजेत. सभोवतालची परिस्थितीही हिंसक घटनांना कारणीभूत ठरते आहे. मुलांच्या हाती आलेल्या स्मार्ट फोनमुळे लहान वयात त्यांना नको त्या गोष्टी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांमध्ये अशा मुलांना निवडून त्यांना शालेय शिक्षणाबरोबर समुपदेशन करणे गरजेचे आहे.
- किशोर गुजर, मानसोपचार तज्ज्ञ

Web Title: Brotherhood, bullying in bulk college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.