Pimpri-Chinchwad Crime| अंगविक्षेप ते अंगप्रदर्शन; सोशल मीडियावर थिल्लरपणातून ‘भाईगिरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 10:38 AM2022-02-18T10:38:35+5:302022-02-18T10:42:44+5:30

सोशल मीडियाचा अनाठायी वापर वाढल्याने रिल्स, शाॅर्ट व्हिडिओ करून थिल्लरपणा केला जात आहे...

brotherhood increasing through content on social media pune | Pimpri-Chinchwad Crime| अंगविक्षेप ते अंगप्रदर्शन; सोशल मीडियावर थिल्लरपणातून ‘भाईगिरी’

Pimpri-Chinchwad Crime| अंगविक्षेप ते अंगप्रदर्शन; सोशल मीडियावर थिल्लरपणातून ‘भाईगिरी’

Next

नारायण बडगुजर

पिंपरी : धमकीवजा तसेच अश्लील भाषेचा वापर करून व्हिडिओ तयार करून काही जणांकडून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. अशा थिल्लरपणातून ‘भाईगिरी’ करण्याकडे कल वाढला आहे. शेअर, लाईक, फालोअर्स वाढविण्यासाठी हा खटाटोप असून, त्यासाठी अंगविक्षेप ते अंगप्रदर्शन करण्यापर्यंत सारेकाही केले जाते. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी नुकतेच काही गुन्हे दाखल केले. एका क्लिकवर साॅफ्ट पाॅर्न उपलब्ध झाल्यासारखाच हा प्रकार असून, असामाजिक प्रवृत्ती त्यामुळे बळावत आहेत, असे मत व्यक्त करून समुपदेशक तसेच मानसोपचार तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

ज्ञानवृद्धी तसेच माहितीची देवाण- घेवाण व्हावी यासाठी तंत्रज्ञानाच्या अद्ययावतीकरणावर भर दिला जातो. मात्र त्यासह मनोरंजनासाठीही त्याचा वापर केला जात आहे. यात निखळ मनोरंजन अपेक्षित आहे. मात्र मनोरंजनाच्या नावाखाली अनावश्यक व्हिडिओ, पोस्टचा मारा केला जातो. त्याचा पुढचा टप्पा म्हणून धमकी देणे, दहशत माजविणे अशा विविध गुन्हेगारीकृत्यांसाठी देखील सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे.

ना कंटेंट ना मनोरंजन

माहिती किंवा मनोरंजन अशा कोणत्याही प्रकारचा ‘कंटेंट’ नसलेले व्हिडिओ तरुणांकडून मोठ्या प्रमाणात व्हायरल केले जात आहेत. त्यालाही हजारो, लाखो लाईक, शेअर्स, फालोअर्स मिळत आहेत. त्यामुळे अशा व्हिडिओ तयार करणाऱ्यांचे फावत आहे.

सोशल मीडियाचा अनाठायी वापर वाढल्याने रिल्स, शाॅर्ट व्हिडिओ करून थिल्लरपणा केला जात आहे. अशा तरुणांचा घरच्यांशी असलेला संवाद कमी झाला आहे. त्यांना वेळीच सावरले पाहिजे. त्यासाठी त्यांचे समुपदेशन केले पाहिजे.
- ॲड. संतोष मोरे, सदस्य, विधी व बालकल्याण समिती, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय

फॅमिली फॅब्रिक याला कारणीभूत आहे. पौगंडावस्थेतील मुले आयडेंटिटि क्रायसिसमधून जातात. या कालावधीत त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण होते. सोशल मीडियातून यात चुकीचा इन्फ्लू्यन्स आल्यास असे प्रकार घडतात. ज्यांना व्यक्त होण्याची संधी मिळालेली नाही, त्यांना हा प्लॅटफार्म वाटतो. मात्र हे क्षणिक आहे. असामाजिक प्रवृत्ती मुलांपेक्षा मुलींमध्ये वेगळी असते. असामाजिक प्रवृत्ती असलेल्या मुलांना थेट मारहाण करण्यात तर मुलींना ‘डायलाॅग’बाजी किंवा चुगली तसेच शिवीगाळ करण्यात रस असतो.  
- डाॅ. मनजित संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ, वायसीएम

सोशल मीडिया कंटेंट फिल्टरिंग केले पाहिजे. पोस्ट करण्याआधीच त्याचे सेन्सरिंग झाले पाहिजे. आक्षेपार्ह पोस्ट डीलीट करण्यासाठी प्रक्रिया केली जाते. गुन्हेगारांनी आऊटसोर्स केल्यास तांत्रिक अडचणी वाढतात. परदेशातील पोस्ट करणाऱ्या वक्तीवर कायदेशीर कारवाई करणे शक्य होत नाही. सोशल मीडियावरील पोस्ट, मजकूर, व्हिडिओ पुढची पिढी पाहणार आहे. त्यातून तुमचे व्यक्तीमत्व तुमच्या मुलांना व मुलींना कळणार आहे. त्यामुळे प्रत्येक पोस्ट विचारपूर्वक केली पाहिजे.
- डाॅ. संजय तुंगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी-चिंचवड

Web Title: brotherhood increasing through content on social media pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.