बीआरटी बसथांब्यांना चढलाय गंज
By admin | Published: July 6, 2015 05:04 AM2015-07-06T05:04:08+5:302015-07-06T05:04:08+5:30
जलदगती आणि उच्च प्रतीची प्रवासीकेंद्रित सार्वजनिक बससेवा देण्याचे दिवास्वप्न पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी दाखविले.
विश्वास मोरे, पिंपरी
जलदगती आणि उच्च प्रतीची प्रवासीकेंद्रित सार्वजनिक बससेवा देण्याचे दिवास्वप्न पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांनी दाखविले. मात्र, महापालिकेचा भोंगळ कारभार, नियोजनाचा अभाव यामुळे सहा वर्षांपासून हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. महापालिका अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर पदाधिकाऱ्यांचा वचक नसल्याने निगडी ते दापोडी या बीआरटी मार्गाचा खेळखंडोबा झाला आहे. नियंत्रण नसल्याने बसथांबे गंजू लागले आहेत. बसथांब्यामध्ये असणारे साहित्य, लेनच्या लोखंडी जाळ्या चोरीला जात आहेत. या नुकसानीकडे कोणाचेही लक्ष नाही, ही दुर्दैवी बाब आहे. या नुकसानीस जबाबदार कोण?
-------------
पुण्यात सपशेल अपयशी ठरलेली बीआरटी सेवा पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधाऱ्यांनी रेटून नेली. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) सार्वजनिक वाहतूक सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने बीआरटी सेवा राबविण्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार निगडी ते स्वारगेटपर्यंतच्या पहिल्या टप्प्यास मंजुरी मिळाली. प्रत्यक्षात पिंपरी-चिंचवड हद्दीतीलच कामास गती मिळाल्याचे दिसून येते. निगडी ते दापोडी या १२ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे काम २००९ मध्ये हाती घेण्यात आले. त्यानंतर अन्य मार्गांचे नियोजन केले. असे असले, तरी अजूनही शहरातील दहापैकी कोणताही मार्ग सुरू झालेला नाही.
बसथांब्यांना गंज
या मार्गावर दोन वेगवेगळ्या प्रकारांच्या डिझाईनचे थांबे दिसून येतात. १४ थांबे काही वर्षांपूर्वीचे असून, त्यांची अवस्था वाईट झाली आहे. सर्वच थांब्यांचे काम अपूर्ण असल्याचे दिसून येते. आकुर्डीतील खंडोबा माळ चौकातील थांब्याची अवस्था बेस्ट सिटीला शोभेशी आहे. याचे साहित्यही चोरून नेले आहे. देखभालीअभावी सर्वच जुने थांबे गंजले आहेत. खंडोबा माळ, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, खराळवाडी, वल्लभनगर, कासारवाडीतील जुन्या थांब्यांची अवस्था खराब आहे. नव्याने उभारलेल्या सर्वच थांब्यांचे काम पूर्ण झालेले नाही. आकुर्डीतील बजाज आॅटोसमोरील प्रातिनिधिक थांबा सोडला, तर पुण्याकडून निगडीला येणाऱ्या थांब्यांची कामे अपूर्णच आहेत. तयार झालेल्या थांब्यांचे उद्घाटन भिकाऱ्यांनीच राहण्यासाठी केले आहे. साहित्यही चोरीला जाऊ लागले आहे.
लेनचे काम अपूर्ण
बीआरटीसाठी बनविलेल्या लेनमध्येही सुसूत्रता दिसून येत नाही. हे काम जागोजागी अपूर्ण आहे. पुण्याकडे जाताना बजाज आॅटो ते खंडोबा माळ चौक, चिंचवड स्टेशन अहिंसा चौक ते स्टेशन चौक, मोरवाडी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नाशिक फाटा चौक ते कासारवाडी येथे, तसेच निगडीकडे येताना कासारवाडी ते नाशिक फाटा चौक, शंकरवाडी पेट्रोलपंप ते वल्लभनगर, पिंपरी चौक ते मोरवाडी, चिंचवड स्टेशन कॉसमॉस बँक ते अहिंसा चौक या लेनचे काम अपूर्ण आहे. तसेच लेनमधील जाळ्या चोरट्यांनी कापून नेल्याचे जागोजागी दिसून येते.
स्वप्न सत्यात साकारणार कधी?
बीआरटीएसबाबत महापालिकेने तयार केलेला आराखडा आणि प्रत्यक्षातील चित्र वेगळेच आहे. त्यामुळे कामास गती मिळत नाही, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मार्गावरील सिग्नल, थांंब्यावर बसचे दरवाजे उघडणे, थांब्यामधील यंत्रणा आधुनिक असल्याचे भासविले जात आहे. अद्यापपर्यंत या थांब्यांवर वीजजोडही दिलेले नाहीत.
सत्ताधारी, विरोधक मूग गिळून
बीआरटी लेन, बसथांबे, इतर यंत्रणेची कामे ही नेत्यांशी किंवा शासकीय यंत्रणेच्या संबंधित लोकांना दिली गेल्याने कामावर कोणाचाही वचक नाही. अनुभव नसलेल्या ठेकदारांचाही त्यात समावेश असल्याने लोखंडी किंवा स्टेनलेस्टील बसथांब्याची बांधणी करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यामुळे कामास उशीर होत आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा प्रकल्प विद्यमान आयुक्तांच्या कालावधीत सुरू न झाल्याने आयुक्तही हतबल असल्याचे दिसून येते. राजकीय नेते आणि अधिकारी यांचे हात ओले होत असल्याने ब्र शब्द काढत नाही. वाहतुकीस अडथळा ठरणारी लेन तयार होऊनही वाहतूकसेवा सुरू न कल्याने काँग्रेस आणि मनसेने लेन तोडून निषेध व्यक्त केला होता. तरीही कोणालाही फरक पडलेला नाही.
सर्वच रस्ते अपूर्ण
बीआरटीचे औंध-रावेत हा १२.५० किमी, नाशिक फाटा ते वाकड हा ८ किमी, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा १०.१७ किमी, टेल्को रस्ता हा १२ किमी, देहू-आळंदी रस्ता हा १४.५० किमी, नाशिक फाटा ते मोशी हा ८.५० किमी, बोपखेल ते आळंदी हा ८.५० किमी, भक्ती-शक्ती ते किवळे ते तळवडे हा ११.८० किमी, हिंजवडी ते केएसबी चौक ७.५० किमी अशा दहा रस्त्यांचा समावेश आहे. मात्र, औंध-रावेत, काळेवाडी फाटा ते चिंचवड पूल, वाकड ते नाशिक फाटा या लेनचे काम सुरू आहे. अन्य सर्वच लेनचे काम अपूर्ण आहे.
ग्रेड सेपरेटरमुळे धोका वाढला
४पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या ६१ मीटर पुणे-मुंबई महामार्गावर ग्रेड सेपरेटर तयार केला आहे. मात्र, ही रस्त्याची रुंदी चिंचवड स्टेशन परिसरात कमी झालेली आहे. बीआरटी लेनचे नियोजन करताना पदपथ, शहरातून जाणारी वाहने, बीआरटी लेन, ग्रेड सेपरेटर लेन यांचा एकत्रित विचार केला न गेल्याने ग्रेड सेपरेटरमध्ये आत शिरणारी वाहने किंवा बाहेर पडणारी वाहने यांचे नियोजन वाहतूक विभागाला विश्वासात न घेताच केल्याचे दिसते. मर्ज इन आणि मर्ज आऊटची ठिकाणे धोकादायक बनली आहेत. बिगबाझार, चिंचवड स्टेशन येथून आतमध्ये वाहन शिरल्यानंतरकाळभोरनगरजवळ बाहेर पडताना, आकुर्डीतील बजाज टेम्पोसमोरून आत शिरल्यानंतर पुढे निगडी पुलाजवळ बाहेर पडताना, पुण्याकडे जाताना काळभोरनगर येथील उतारावर बाहेर जाण्याचा मार्ग, टायटन शोरूमजवळ ग्रेड सेपरेटमध्ये जाणे, पिंपरीतील हाफकिनसमोरील बाहेर पडण्याचा मार्ग धोकादायक आहेत. याबाबत वाहतूक पोलीस शाखा, स्थापत्य विभाग, रस्त्याचे काम करणारे ठेकेदार, बीआरटीचे काम पाहणारे अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन नियोजनाची गरज आहे.