बीआरटी प्रकल्प लवकरच मार्गी , चार महिन्यांत बस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 06:07 AM2018-06-05T06:07:12+5:302018-06-05T06:07:12+5:30
बोपखेल फाटा ते आळंदी दरम्यान पुणे-आळंदी मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. बस थांबे करण्याचे काम हाती घेतले आहे. चार महिन्यांत या मार्गावर बीआरटी बस धावेल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपरी : बोपखेल फाटा ते आळंदी दरम्यान पुणे-आळंदी मार्गावर बीआरटी सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्याचे काम सुरू आहे. बस थांबे करण्याचे काम हाती घेतले आहे. चार महिन्यांत या मार्गावर बीआरटी बस धावेल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) यांना याविषयी हर्डीकर यांनी पत्र पाठविले आहे. त्याविषयी ते म्हणाले, ‘‘निगडी ते दापोडी या बीआरटीएस मार्गावर सुरक्षिततेबाबत उपाययोजना केल्या आहेत. याबाबत न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. लवकर न्यायालयाचा अंतिम निर्णय होईल. त्यानंतर या मार्गावर बीआरटी बस सुरू करण्यात येणार आहे. पुणे-मुंबई महामार्गावर मेट्रोचे कामदेखील जलदगतीने सुरू आहे. मेट्रोकडून बीआरटी मार्गावर चुकीने तीन पिलर उभारण्यात आले आहेत. ते बीआरटी बसला अडथळा ठरणारे आहेत. त्यामुळे पालिकेने हे पिलर काढण्याची सूचना महामेट्रोला केली आहे. मेट्रो हे पिलर काढणार आहे.’’
- पूर्वलक्ष्यी प्रभावाने राज्य सरकारने अनधिकृत बांधकामावरील शास्तीकर माफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा शहरातील ५० ते ६० हजार नागरिकांना फायदा होऊ शकतो, असा दावा आयुक्त हर्डीकर यांनी केला आहे. ओला-सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती करीत आहोत. परंतु, नागरिकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.