बीआरटी मार्ग दुचाकीसाठी

By admin | Published: March 17, 2017 02:14 AM2017-03-17T02:14:24+5:302017-03-17T02:14:24+5:30

निगडी ते दापोडी या रस्त्यावर उभारलेला बीआरटीएसमार्ग दुचाकी चालकांसाठी खुला करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवडमहापालिकेने घेतला आहे.

BRT route to bike | बीआरटी मार्ग दुचाकीसाठी

बीआरटी मार्ग दुचाकीसाठी

Next

पिंपरी : निगडी ते दापोडी या रस्त्यावर उभारलेला बीआरटीएसमार्ग दुचाकी चालकांसाठी खुला करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवडमहापालिकेने घेतला आहे. लोखंडी रेलिंग उभे करून बीआरटी बससाठी स्वतंत्र मार्ग तयार केला आहे. परंतु, गेल्या चार वर्षांपासून या मार्गावर बीआरटी बस सुरू करता न आल्यामुळे तो बंद ठेवला होता. वाहनचालकांची गैरसोय लक्षात घेऊन बीआरटी बससुरू होईपर्यंत हा मार्ग दुचाकीचालकांसाठी खुला करण्याची सूचना भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार निगडी ते दापोडी या रस्त्यावरील बीआरटी मार्ग सोमवारपासून दुचाकी वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती सह शहर अभियंता राजन पाटील यांनी दिली.
निगडी ते दापोडी, सांगवी ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड, काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी आणि देहू-आळंदी या पाच रस्त्यांचा बीआरटीएसमध्ये समावेश आहे. त्यापैकी सांगवी ते किवळे या रस्त्यावर बीआरटीएस बससेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, सर्वांत आधी निगडी ते दापोडी या साडेबारा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर बीआरटीएस बससेवा सुरू करण्याचे नियोजन होते. परंतु, या मार्गावर अशी बससेवा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन फसले आहे.(प्रतिनिधी)

बस मार्गाचे काम संथगतीने
निगडी ते दापोडी या रस्त्यावर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बीआरटीएस बससेवा विनाअडथळा सुरू करणे प्रशासनासाठी जिकिरीचे बनले आहे. नाशिक फाटा येथील उड्डाणपुलावरून बीआरटीएस थांब्याकडे ये-जा करण्यासाठी सध्या पूल बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्याचे रुंदीकरण, पादचारी मार्गाच्या विकसनाचे काम सुरू आहे. या दोन्ही कामांमुळे निगडी ते दापोडी रस्त्यावरील बीआरटीएस मार्ग सुरू होण्यास विलंब होत आहे.
बीआरटीएसच्या उर्वरित मार्गाच्या बाजूने लोखंडी रेलिंग उभारून हा मार्ग बंद ठेवला आहे. त्यामुळे निगडी ते दापोडी रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो.गेल्या चार वर्षांपासून वाहनचालकांना हा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे हा मार्ग दुचाकी वाहनांसाठी खुला करण्याची सूचना आयुक्तांना केली होती.
बीआरटीएस बससेवा सुरू झाल्यानंतर या मार्गावर कोणत्या वाहनांना प्रवेश द्यायचा याबाबत फेरविचार करून तसा निर्णय घेण्यासही सांगितले होते. त्यानुसार आयुक्तांनी निगडी ते दापोडी या रस्त्यावर उभारलेला बीआरटीएस मार्ग दुचाकीवाहनांसाठी खुला करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे आमदार लक्ष्मण जगताप यांनीसांगितले.

Web Title: BRT route to bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.