बीआरटीचे होणार ‘सेफ्टी आॅडिट’ , नऊ वर्षांनी सापडणार मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 05:00 AM2018-01-01T05:00:29+5:302018-01-01T05:00:38+5:30

गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या दापोडी-निगडी अतिजलद बस सेवा मार्गावर (बीआरटीएस) येत्या मंगळवारी (दि. २) प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. सेफ्टी आॅडिट केल्यानंतर त्यांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करून परवानगी घेऊन प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू केली जाईल.

 BRT will get 'safety audit', Muhurat to be found after nine years | बीआरटीचे होणार ‘सेफ्टी आॅडिट’ , नऊ वर्षांनी सापडणार मुहूर्त

बीआरटीचे होणार ‘सेफ्टी आॅडिट’ , नऊ वर्षांनी सापडणार मुहूर्त

Next

पिंपरी : गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेल्या दापोडी-निगडी अतिजलद बस सेवा मार्गावर (बीआरटीएस) येत्या मंगळवारी (दि. २) प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. सेफ्टी आॅडिट केल्यानंतर त्यांचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करून परवानगी घेऊन प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू केली जाईल. त्यामुळे सेफ्टी आॅडिटचे दिव्य पेलावे लागणार आहे.
केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेंतर्गत (जेएनएनयूआरएम) सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी निधी मिळाला होता. त्या अंतर्गत बीआरटीचे जाळे तयार करण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. राष्टÑवादी काँग्रेसची महापालिका सत्ता असल्याने त्यांनी २००९ला सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहराची मुख्य वाहिनी असणाºया पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी-निगडी या बीआरटी मार्गाचे नियोजन केले होते. त्यानुसार कामही सुरू झाले. मात्र, एकाच मार्गावर ग्रेड सेपरेटर, बीआरटी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी स्वतंत्र मार्ग असल्याने या मार्गावर बीआरटी यशस्वी होणार नाही, असा दावा करून याबाबत न्यायालयात दावा दाखल झाला होता. त्यामुळे गेले अनेक वर्षे हा मार्ग रखडला होता. त्यामुळे या मार्गावरील लेनसाठी केलेला खर्च वाया गेल्याचा आरोप झाला. बीआरटी मार्गासाठी केलेले बसथांबे वापराविना धूळखात आहेत. महापालिका निवडणूक होण्यापूर्वी राष्टÑवादीनेही हा मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते; मात्र, त्यास यश आले नव्हते. महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपाची सत्ता आली. त्यानंतरही तीनदा काढलेला मुहूर्त साधलेला नाही. जानेवारीत हा मार्ग सुरू करण्यासंदर्भात उपाययोजना केल्या जात आहेत. हा तरी मुहूर्त साधावा, अशी मागणी सजग नागरिकांकडून होत आहे.
तांत्रिक त्रुटी पुढे करून निगडी ते दापोडी हा मार्ग सुरू करण्यास विलंब केला जात आहे, असा आक्षेप भाजपातील एका गटाने घेतला होता. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा मार्ग का सुरू केला जात नाही, याची चौकशी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. तसेच बीआरटी मार्ग सुरू करण्यात वेळकाढूपणा करणाºया अधिकाºयांची जबाबदारी काढून घ्यावी, अशीही मागणी केली होती. हा मार्ग रखडल्याने महापालिकेचे नुकसान होत आहे. त्यामुळे बीआरटीतील त्रुटी काढून हा मार्ग लवकरात लवकर सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हा प्रकल्प तातडीने सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा, मर्ज इन आणि मर्ज आऊट येथे अपघात होणार नाहीत, असे उपाय योजणे सुरू आहे. क्रॉसिंग आणि चौकांच्या ठिकाणीही अपघात होणार नाही याचीही दक्षता घेतली जात आहे. बीआरटी मार्गावर इतर कोणतेही वाहन घुसू नये, यासाठी उपाय योजले जात आहेत. तसेच नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठीही यंत्रणा उभी केली आहे. वाहनचालकांना वाहतूक शिस्त लावणे आणि बीआरटी मार्गावर प्रबोधनाचे प्रयत्न करण्यात येत आहे. शहरातील पहिला मार्ग गेली ९ वर्षे सुरू झालेला नाही. त्यानंतर रावेत ते औंध, वाकड ते नाशिक फाटा चौक हे मार्ग सुरू झाले. काळेवाडी ते आळंदी रस्ता या मार्गाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. निगडी ते दापोडी ही साडेबारा किलोमीटर अंतराची बीआरटी सेवा सुरू करण्याबाबत महापालिका भवनात आढावा बैठक झाली.

असे आहेत बीआरटी मार्ग
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बीआरटीएसअंतर्गत खालील रस्त्यांचा समावेश केलेला आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने खालील नियोजित मार्गांचा विकास करण्यात येत आहे. रस्त्यांची सद्य:स्थिती पुढीलप्रमाणे-

रस्ता किलोमीटर सद्य:स्थिती
१) पुणे-मुंबई रस्ता (दापोडी-निगडी) १२.५० किमी रस्ता विकसित करण्यात आलेला आहे.
सेवा जानेवारीत प्रस्तावित
२) औंध-रावेत रोड (सांगवी-किवळे) १४.५० किमी रस्ता विकसित करून बीआरटीएस सुरू
३) नाशिक फाटा ते वाकड ८ किमी बीआरटीएस दोन वर्षांपासून सुरू
४) काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता १०.७० किमी रस्ता विकसित, बससेवा एप्रिलमध्ये प्रस्तावित
५) टेल्को रोड १२ किमी रस्ता विकसित करण्यात येत आहे.
६) देहू-आळंदी रस्ता १५.२० किमी रस्ता विकसित असून वाहतुकीसाठी खुला आहे.
७) नाशिक फाटा ते मोशी १२.२० किमी ६० मीटर रस्ता विकसित होणार आहे. काम अपूर्ण.
८) बोपखेल ते आळंदी ९.०० किमी रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण.
९) भक्ती शक्ती चौक ते किवळे ५.२० किमी रस्ता विकसित करण्याचे काम ५५ टक्के पूर्ण.
१०) केएसबी चौक ते हिंजवडी १३.३० किमी रस्ता विकसित करण्याचे काम ७५ टक्के पूर्ण.

 

Web Title:  BRT will get 'safety audit', Muhurat to be found after nine years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे