‘सेफ्टी आॅडिट’विनाच धावणार बीआरटी

By Admin | Published: September 3, 2015 03:18 AM2015-09-03T03:18:29+5:302015-09-03T03:18:29+5:30

मोठा गाजावाजा करीत रखडलेला किवळे-सांगवी हा ‘बीआरटीएस’ प्रकल्प शनिवारी सुरू करण्याचे नियोजित आहे. मात्र, याच बीआरटीएस मार्गाचे अद्याप ‘सेफ्टी आॅडिट’च झालेले नाही.

BRT will run without 'Safety Audit' | ‘सेफ्टी आॅडिट’विनाच धावणार बीआरटी

‘सेफ्टी आॅडिट’विनाच धावणार बीआरटी

googlenewsNext

मंगेश पांडे, पिंपरी
मोठा गाजावाजा करीत रखडलेला किवळे-सांगवी हा ‘बीआरटीएस’ प्रकल्प शनिवारी सुरू करण्याचे नियोजित आहे. मात्र, याच बीआरटीएस मार्गाचे अद्याप ‘सेफ्टी आॅडिट’च झालेले नाही. निगडी-दापोडी मार्गाचे आॅडिट केले असून, त्यामध्ये दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी किवळे-सांगवी मार्गावर करण्यात आल्याचे महापालिका प्रशासन सांगत आहे. मात्र, ‘सेफ्टी आॅडिट’विनाच धावणाऱ्या ‘बीआरटीएस’ मार्गिकेमधील बसचा प्रवास कितपत सुरक्षित असेल, अशी भीती शहरवासीयांमध्ये निर्माण झाली आहे.
जलद व विनाअडथळा प्रवास व्हावा, यासाठी शहरात बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम (बीआरटीएस) प्रकल्प राबविण्याचे नियोजन करण्यात आले. तरीही निगडी-दापोडी, किवळे-सांगवी, देहू-आळंदी रस्ता ते काळेवाडी आणि नाशिक फाटा-वाकड या मार्गांवर ‘बीआरटीएस’चे काम सुरू करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून या मार्गिका बांधणीचे काम सुरू आहे. प्रशस्त रस्ते असताना बीआरटीएस कशासाठी? यामुळे या प्रकल्पाला विरोधदेखील झाला. मात्र, तरीही प्रकल्पाचे काम सुरूच ठेवले. यापैकी किवळे-सांगवी आणि निगडी-दापोडी मार्गिकेचे काम पूर्ण झाले असताना या मार्गावर बससेवा सुरू करण्याचे मुहूर्त महापालिकेने अनेक वेळा पुढे ढकलले.
निगडी-दापोडी या मार्गाचे इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी (आआयटी) या संस्थेकडून ‘सेफ्टी आॅडिट’ झाले आहे. यासह चार दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या पुण्यातील संगमवाडी ते विश्रांतवाडी या मार्गाचेही ‘सेफ्टी आॅडिट’ झालेले आहे. तर, दुसरीकडे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणाऱ्या किवळे-सांगवी मार्गिकेचे अद्याप ‘सेफ्टी आॅडिट’च झालेले नाही. यामुळे या मार्गातून सुरक्षितरीत्या प्रवास होणार का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याचाच प्रत्यय सोमवारी पदाधिकारी-अधिकारी यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यावेळी आला. रावेतमध्ये बस बसथांब्याला जोरात घासली. सुरुवातीपासूनच या प्रकल्पातील अडथळा जाणवला. उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभर या मार्गावर बीआरटी बसची चाचणी घेतली जात आहे. या मार्गाची पाहणी करण्यासाठी आयुक्त राजीव जाधव यांनी पदाधिकाऱ्यांना सोमवारी चाचणीसाठी नेले. मात्र, अवघ्या काही मिनिटांतच एक बस बंद पडली. त्यामुळे खुद्द पदाधिकारी, अधिकाऱ्यांवरच अडचणींचा सामना करण्याची वेळ आली.
या मार्गिकेवर एकूण २१ थांबे असून, दहा ठिकाणी स्पीड टेबल पद्धतीचे गतिरोधक उभारण्यात आले आहेत. बीआरटीएस मार्गिका अवघ्या साडेतीन मीटर रुंदीच्या आहेत. त्यामुळे यातून प्रवास करताना चालकांना तितकीच काळजी घ्यावी लागणार आहे. इतर वेळी प्रशस्त रस्त्यावर बस हाकणाऱ्या चालकांना या मार्गिकेमधून बस चालविताना कसरत करावी लागणार असल्याचे दिसते. यामुळे चालकांनाही चांगले प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.

Web Title: BRT will run without 'Safety Audit'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.