बीआरटीएसची लागली वाट, बॅरिकेड गेले चोरीला; रस्त्यावर पसरली खडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:28 AM2017-10-26T01:28:42+5:302017-10-26T01:28:46+5:30
पिंपरी : शहरातील बीआरटीएस कधी सुरू होणार याबाबत अनभिज्ञता कायम आहे. त्यामुळे बीआरटीचा खर्च पाण्यात जाणार की काय, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.
पिंपरी : शहरातील बीआरटीएस कधी सुरू होणार याबाबत अनभिज्ञता कायम आहे. त्यामुळे बीआरटीचा खर्च पाण्यात जाणार की काय, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे. निगडी ते दापोडी दरम्यानच्या बीआरटीएस मार्गात रस्त्याची, बसथांब्यांची, लोखंडी जाळ्यांची मोडतोड होऊन वाट लागली आहे. दापोडी ते निगडी हा बीआरटीएस मार्ग असून यावर ३२ थांबे आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स बसविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी बसथांबेही पूर्वीच बांधण्यात आले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वापराविना पडलेले बसथांबे खराब झाले आहेत. काही ठिकाणी बसथांबे दुरुस्तीचे काम सुरू आहे.
फुगेवाडी येथे बसथांब्यावर खोदाई करण्यात आली आहे. कुंदननगर येथील बसथांबा नव्याने बसविण्याचे काम सुरू आहे. बॅरिकेड्सदेखील काही ठिकाणी वाहनांच्या धडकेने तुटलेले आहेत. बसथांबे दुरुस्त केले, तरी पुन्हा एकदा बसथांब्याचा फरश्या तुटल्या आहेत. बीआरटीची कामे सप्टेंबरअखेर पूर्ण करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला होता. परंतु तो मुहूर्त टळला असून आता बीआरटी कधी होणार याबाबत प्रतीक्षा कायम आहे.
वाहनचालक झाले त्रस्त
किवळे : किवळे -सांगवी बीआरटी रस्ता किवळे ते रावेत दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संबंधित विविध विभागांचे दुर्लक्ष झाल्याने प्रवासी, ग्रामस्थ व वाहनचालक त्रस्त आहेत. मुख्य व बीआरटी रस्त्यावरील अडथळे, बसथांब्यांचेसताड उघडे दरवाजे, कमालीची अस्वच्छता, विविध ठिकाणी खचलेला रस्ता ,पांढरे पट्टे पुसत झालेले व अधिक उंचीचे गतिरोधक, पदपथावरील अडथळे व अतिक्रमणे, चौकांचे रखडलेले सुशोभीकरण याकडे महापालिकेचे दोन वर्षांत झालेले दुर्लक्ष यामुळे हा रस्ता अत्यंत असुरक्षित व धोकादायक बनला असल्याचे लोकमतने बुधवारी सकाळी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.
किवळे ते सांगवी बीआरटी मार्गावर पाच सप्टेंबर २०१५ पासून म्हणजेच गेल्या २५ महिन्यांपासून बससेवा सुरु झाली आहे. मात्र किवळे ते रावेत दरम्यानच्या रस्त्यावरून जात असताना बीआरटी मार्गासह इतर वाहनांसाठी वापरात असणाºया शेजारच्या रस्त्याची विविध ठिकाणी दुरवस्था झाली आहे. रावेत गाव, तसेच पंपिंग स्टेशन बसथांब्याजवळच्या भागातील रस्त्यावर विविध ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. भोंडवेवस्ती नजीक मुख्य रस्ता दोन ठिकाणी खचला असल्याने वाहने आदळतात.
किवळेकडून रावेतकडे जाताना व येताना संपूर्ण विविध ठिकाणी नव्याने पथदिवे हटवून रस्ता रुंदीकरण केलेल्या ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे व्यवस्थित बुजविले नाहीत. रस्त्याच्या पदपथावर अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य व मातीचे ढीग पडले आहे. दोन्ही बाजूंकडील रस्त्यावरील माती व खडीमुळे दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. रस्त्यावर व गतिरोधकावर अनेक ठिकाणी मारलेले पांढरे पट्टे फिक्के झाले आहेत.त्यामुळे वाहनचालकांना गतिरोधक दिसत नाहीत. काही गतिरोधक निकषाप्रमाणे तयार करण्यात आले नसल्याने वाहनांना घासून अपघात होत आहेत. अपघातप्रवण क्षेत्रात रस्त्यावर लावलेल्या रबरी पट्ट्या निघाल्या आहेत. पावसाळी गटार व्यवस्था असतानाही पावसाचे पाणी गटारीत जात असल्याने पावसाळ्यात मुख्य रस्त्यालगत पाण्याची तळी साचत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मुंबई -पुणे द्रुतगती मार्गाकडे ये -जा करण्यासाठी जवळचा रस्ता असल्याने वाहनांची प्रचंड वर्दळ वाढली आहे. वाहनांच्या वेगावर व शिस्तीवर नियंत्रण राहिले नाही. निष्काळजीपणे व बेभानपणे वाहने हाकली जात आहेत. चिंचवड स्टेशन येथून होणारी बेकायदा वाहतूक याचमार्गे होत आहे.
पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठीकोणाचीही पर्वा हे वाहनचालक करीत नाहीत. किवळे ते रावेत दरम्यान पुढे गाव आहे, वळण रस्ता, धोक्याचा इशारा देणारे दिवे ,रेडियम पट्ट्या लावलेल्या नाहीत. रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील पहिल्या लेनवर व लोखंडी जाळ्यांजवळ मातीचा थर साचलेला आहे. सर्वच लोखंडी जाळ्या गेल्या दोन वर्षांत स्वच्छ केल्या नसल्याने घाणेरड्या दिसत आहेत. वेगमर्यादा पाळण्याबाबत मार्गदर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. रस्त्याची व पदपथांची नियमित स्वच्छता करण्यात येत नसल्याने संपूर्ण रस्त्याच्या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे.
वाहनांची गती कमी करण्यासाठी सर्वाधिक वर्दळीच्या मुकाई चौकाजवळ दोन गतिरोधक बनविणे गरजेचे आहे. किवळेतील मुकाई चौक व रावेत शिंदे वस्तीकडे जाणाºया चौकाजवळ वर्तुळाकार वाहतूक होत नसल्याने वाहने एकमेकांवर आदळून अपघात होत आहेत. येथील दोन्ही चौकांचे सुशोभीकरण व सुधारणा होणे गरजेचे असून दोन्ही चौकांत सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसविणे गरजेचे आहे.
- संकलन : योगेश्वर माडगूळकर,
देवराम भेगडे