‘बीआरटीएस’ म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण
By admin | Published: May 26, 2017 06:07 AM2017-05-26T06:07:31+5:302017-05-26T06:07:31+5:30
निगडी-दापोडी मार्गावरील बीआरटीएस म्हणजे महापालिका अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण आहे. अनेक जणांचे जीव या मार्गामुळे जात आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : निगडी-दापोडी मार्गावरील बीआरटीएस म्हणजे महापालिका अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण आहे. अनेक जणांचे जीव या मार्गामुळे जात आहेत. असे असतानाही महापालिकेतर्फे बीआरटीएसबाबत गोलमेज परिषद आहे. हा प्रकार म्हणजे शहरवासीयांची फसवणूक असून, महापालिका प्रशासनाचे बौद्धिक दिवाळे निघाल्याचे लक्षण आहे. निगडी- दापोडी बीआरटीएस मार्गाला सातत्याने विलंब होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा सरचिटणीस अमोल थोरात यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे याबाबत अमोल थोरात यांनी निवेदन दिले आहे. थोरात म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेतर्फे बीआरटीएस प्रकल्प राबविण्यात येत आहे. निगडी-दापोडी दरम्यानही बीआरटएस मार्ग उभारला आहे. मात्र, काही वर्षांपासून या मार्गाला सातत्याने विलंब करण्यात येत आहे. तांत्रिक त्रुटी पुढे करून महापालिकेचे संबंधित अधिकारी वेळ मारून नेत आहेत. यातून केवळ काही ठेकेदारांचे हित साधण्याचा प्रयत्न होत आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या मार्गाच्या कामात अनेक त्रुटी दाखवत आणि या मार्गाच्या कामाला विलंब करत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. परिणामी या मार्गाचे काम अपूर्णावस्थेत आहे. यात अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले.