चिंचवडमध्ये तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण खून; दहशत पसरविण्यासाठी केला गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 07:49 PM2022-12-03T19:49:03+5:302022-12-03T19:50:55+5:30
याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली...
पिंपरी : पूर्ववैमनस्य आणि व्यावसायिक स्पर्धेतून १८ जणांनी तरुणावर कोयत्याने सपासप वार करत त्याचा निर्घृणपणे खून केला. त्यानंतर आरोपींनी दहशत पसरविण्यासाठी हवेत गोळीबार केला. परशुराम चौक, चिंचवड येथे शुक्रवारी (दि. २) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली.
विशाल नागू गायकवाड (रा. मोरेवस्ती, चिखली) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ अर्जुन गायकवाड (वय ३२) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राजू मरिबा कांबळे, सिद्धया मरिबा कांबळे, कच्चा उर्फ मिलिंद मरिबा कांबळे (सर्व रा. फुलेनगर, चिंचवड), करण ससाणे, मोहन विटकर, अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्यासह दाद्या उर्फ विशाल मरिबा कांबळे (रा. फुलेनगर, चिंचवड), विशाल लष्करे (रा. रामनगर, चिंचवड), करण उर्फ ससा, सीजे उर्फ चैतन्य जावीर, ओमकार शिंदे, यश कुसाळकर, करण गायकवाड, रोहित मांजरेकर, सुरज मोहिते, नीलेश लष्करे, बालाजी कोकाटे आणि दोन ते तीन अनोळखी इसमांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
परशुराम चौकात फिर्यादी अर्जुन यांचे वॉशिंग सेंटर आहे. शुक्रवारी सायंकाळी अर्जुन हे वॉशिंग सेंटर समोर रस्त्याच्या पलीकडील बाजूला चहा पिण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी वॉशिंग सेंटरवर आले. आरोपींनी फिर्यादीचा भाऊ विशाल गायकवाड याच्यावर कोयत्याने वार केले. वॉशिंग सेंटरमध्ये काम करणाऱ्या कामगाराने धावत जाऊन याबाबत अर्जुन यांना सांगितले. त्याचवेळी एका आरोपीने पिस्तुलातून दोन ते तीन गोळ्या हवेत झाडल्या. गोळीबार झाल्याने परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली. अर्जुन यांनी वॉशिंग सेंटरमध्ये धाव घेतली. त्यावेळी विशाल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. जखमी विशालला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग
अर्जुन आणि विशाल हे दोघे भाऊ चार वर्षांपासून वॉशिंग सेंटर चालवत आहेत. जवळच विशाल कांबळे याचेही वॉशिंग सेंटर आहे. अर्जुन यांचे वॉशिंग सेंटर चांगले चालत असल्याने व्यावसायिक स्पर्धेतून विशाल कांबळे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून विशाल गायकवाड याचा खून केला. तसेच २०१७ मध्ये विशाल कांबळे यांचे कुटुंबीय आणि अर्जुन यांच्यात भांडण झाले होते. त्याचाही राग आरोपीच्या मनात होता.