Maharashtra Budget 2023: तुकोबारायांच्या वचनाने अर्थसंकल्पास सुरुवात; देहूला मिळाला ठेंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:05 PM2023-03-10T12:05:38+5:302023-03-10T12:05:47+5:30
अर्थसंकल्पात संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी देहूगाव, भंडारा डोंगर, भामचंद्र या तीर्थस्थळांना काहीच नाही
पिंपरी : महाविकास आघाडी कोसळून नव्याने शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला. ‘पिकवावे धन, ज्याची आस करी जन’ या अभंगाने फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात केली. मात्र, अर्थसंकल्पात संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी देहूगाव, भंडारा डोंगर, भामचंद्र या तीर्थस्थळांना ठेंगा दाखविला आहे. तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी एक रुपयाही निधी दिलेला नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायातून नाराजी व्यक्त होत आहे.
भाजप -शिवसेना (शिंदे गट)चे सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला. अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. फडणवीस यांनी भाषणाची सुरुवात संत तुकाराम महाराजांच्या ‘पिकवावे धन, ज्याची आस करी जन’ या अभंगाने केली. त्यामुळे तुकोबांच्या कर्मभूमीसाठी काहीतरी पॅकेज किंवा योजना असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्पात संत तुकाराम महाराजांची कर्मभूमी देहू, चिंतन स्थळ भंडारा, भामचंद्र डोंगर विकासासाठी तरतूद केली नसल्याचे दिसून आले. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहूगावला भेट दिली होती. शिळामंदिराचे लोकार्पण केले. त्यावेळी केंद्राकडून तीर्थक्षेत्र विकासाला निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी भाषणातून वारकऱ्यांची मने जिंकली. कोणताही निधी दिला नाही. वारकऱ्यांची निराशा झाली होती.
राज्याच्या अर्थसंकल्पात देहूगाव, भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगराच्या विकासासाठी निधी दिला जाईल, तसेच संत तुकाराम महाराजांच्या गाथेला अनुदान मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अर्थसंकल्पाने देहूकरांची निराशा केली आहे.
देहूवरही केला अन्याय
धार्मिक क्षेत्रांचा विकासामध्ये संत सेवालाल महाराज स्मारक पोहरादेवी, उमरी तीर्थक्षेत्र विकासाठी पाचशे कोटी, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ, वैजनाथ या प्राचीन मंदिरांच्या संवर्धनासाठी तीनशे कोटी, ज्योतिबा परिसर संवर्धन प्राधिकरणासाठी पन्नास कोटी, संत गाडगेबाबा समाधीस्थळ, ऋणमोचन विकासासाठी २५ कोटी रुपये, चक्रधर स्वामी महानुभाव संबंधित रिद्धपूर, काटोल, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव नांदेड, पांचाळेश्वर, पैठण विकासासाठी भरीव निधी तसेच प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज स्मारकासाठी भरीव निधी आणि गहिनीनाथ गडाच्या संवर्धन-विकासासाठी २५ कोटी, संत जगनाडे महाराज आर्ट गॅलरी, नागपुरासाठी सहा कोटी रुपये, आणि संत जगनाडे महाराज समाधीस्थळ, सुदुंबरे विकासासाठी २५ कोटी रुपयांचा निधीची तरतूद केली आहे. त्यात सरकारने देहूला ठेंगा दाखविला आहे.