चर्चेविना पालिकेचा अर्थसंकल्प मंजूर
By Admin | Published: June 16, 2017 04:50 AM2017-06-16T04:50:03+5:302017-06-16T04:50:03+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने चर्चेविना मंजूर केला. महापौर नितीन काळजे यांनी अठरा मिनिटांत ४ हजार
- लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने चर्चेविना मंजूर केला. महापौर नितीन काळजे यांनी अठरा मिनिटांत ४ हजार ८०५ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला. सभाशास्त्राचे उल्लंघन केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केला. अर्थसंकल्पावर बोलू न देणे ही लोकशाहीची गळचेपी झाली असून, भाजपाची हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या सदस्यांनी सभात्याग केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात झाली. निवडणुकीमुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडला होता. आयुक्त दिनेश वाघमारे यांनी अर्थसंकल्प मंजूर करून कार्यवाही सुरू केली होती. दरम्यान, महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर स्थायी समितीची निवड झाल्यानंतर आयुक्तांनी अर्थसंकल्प सभापती सीमा सावळे यांच्याकडे सुपूर्त केला होता. त्यानंतर त्यावर स्थायी समितीत चर्चा होऊन अंतिम मंजुरीसाठी दोन मदिन्यांनी हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर आणण्यात आला. त्यासाठी आज विशेष सभा बोलविण्यात होती. दुपारी दोनला सर्वसाधरण सभा सुरु झाली. सुरूवातीला विविध क्षेत्रांतील मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर नगर सचिव उल्हास जगताप यांनी सभेचे कामकाज कसे असेल याची माहिती दिली. स्थायी समिती सभापती अर्थसंकल्पाचे सादरीकरण करतील. त्यावर चर्चा, नंतर उपसूचना स्वीकारून मंजुरी देण्यात येईल, असे सांगितले. सभागृहात प्रथमच अर्थसंकल्प सादरीकरणासाठी दोन स्क्रीन लावण्यात आले होते. तसेच
महापौर, आयुक्त आणि स्थायी
समिती सभापतींसमोर संगणक ठेवण्यात आले होते. सावळे
यांनी सुमारे पंधरा मिनिटांच्या मनोगतात अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये सांगितली. चर्चा सुरू होण्यापूर्वीच भाजपा सदस्य नामदेव ढाके यांनी बोलण्यासाठी हात वर केला.
सभा चालवायचा महापौरांचा अधिकार
अर्थसंकल्पाला मंजुरी मिळावी, अशी मागणी केली. त्यास सुजाता पालांडे यांनी अनुमोदन दिले आणि महापौरांनी क्षणाचाही विलंब न लावता, त्यास मंजुरी दिली. त्यावर विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी आक्षेप घेतला. सभाशास्रचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. नगरसचिवांंनी खुलासा करावा, अशी मागणी केली. त्यावर जगताप म्हणाले, की सभा कशी चालवायची हा महापौर यांचा अधिकार आहे.
सभागृहात बोलू न दिल्याने सभागृहातून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. पारदर्शकतेचे पहारेकरी महापालिकेतील सत्तारुढ भाजपाने अर्थसंकल्पीय चर्चेचा खेळखंडोबा केला. महापालिकेच्या ३५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विनाचर्चा अर्थसंकल्प मंजूर केल्याचा विक्रम भाजपाने आपल्या खात्यावर नोंदविला. एवढेच नव्हे, तर विरोधकांनी सभात्याग केल्यावरही भाजपाचे नवोदित नगरसेवक आपल्याच कोडकौतुकात रममाण झाले, तर शिवसेनेसह राष्ट्रवादी कॉँग्रेस, मनसेने भाजपाच्या या दडपशाहीचा धिक्कार केला.