अर्थसंकल्पात जुन्या योजना
By admin | Published: December 23, 2016 12:43 AM2016-12-23T00:43:12+5:302016-12-23T00:43:12+5:30
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने घाईघाईने अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ३६८ कोटी ९० लाख रकमेचा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने घाईघाईने अर्थसंकल्प सादर करण्यात आला. ३६८ कोटी ९० लाख रकमेचा हा अर्थसंकल्प असून, त्यात ३३३ कोटी ८० लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच ३५ कोटी १० लाख रूपये शिलकीचा हा अर्थसंकल्प आहे. त्यात नवीन योजनांचा अभाव असून, जुन्याच योजना मागील पानावरून पुढे आल्या आहेत.
प्राधिकरण सभेच्या अध्यक्षस्थानी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम होते. त्यात २०१७ - १८ चा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी सतीशकुमार खडके यांनी सादर केला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी रमेश कुलगोड यांनी हा अर्थसंकल्प तयार केला आहे. सभेमध्ये चर्चा होऊन मान्यता देण्यात आली. ३६८ कोटी ९० लाख रकमेचा हा अर्थसंकल्प असून त्यात ३३३ कोटी ८० लाख एवढा खर्च अपेक्षित आहे. ३५ कोटी १० लाख रुपयांची शिल्लक दर्शविली आहे.
जमा तपशिलामध्ये आरंभीची शिल्लक ३०२ कोटी ४० लाख असून त्यात महसुली जमा २४ कोटी ७३ लाख रुपये, तर भांडवली जमा ४१ कोटी ७३ लाख रुपये आहे. त्यात विविध पेठांमधील भूखंड विक्रीतून २५ कोटी, अतिरिक्त अधिमूल्य आणि हस्तांतरण शुल्कातून ८ कोटी ४७ लाख, विकास निधी व व्याजातून ६ कोटी आणि ठेवीवरील व्याजातून २१ कोटी रुपये तसेच ठेकेदारांच्या ठेवीमधून १ कोटी ५३ लाख रुपये जमा अपेक्षित आहे.
खर्चाच्या तपशिलात महसुली खर्चासाठी ३३ कोटी १५ लाख, भांडवली खर्चासाठी ३०० कोटी ६४ लाख रक्कम प्रस्तावित आहे. विविध विकास कामांसाठी १०३ कोटी ५६ लाख, आस्थापनेचा खर्च ११ कोटी ५० लाख, उद्यान, पर्यावरण, सुधारणा व शहरी वनीकरणासाठी २० कोटी ८२ लाख, अभियांत्रिकी विभागाकडील कामांसाठी १०३ कोटी ९ लाख रुपयांची तरतूद आहे.
विकासकामांमध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रासाठी ३४ कोटी ८० लाख, पेठ क्रमांक ३० मधील गृहयोजनेसाठी ५४ कोटी १० लाख, वाल्हेकरवाडी, भूखंड गृहयोजनेसाठी ५४ कोटी १० लाख, रस्त्याच्या कामांसाठी ४९ कोटी २० लाख, साई चौकातील उड्डाणपुलासाठी १४ कोटी, भूसंपादनासाठी ७० कोटी तर पर्यावरण सुधारणा कामासाठी २० कोटी ८२ लाख आणि विद्युतीकरणासाठी २३ कोटी ७० लाखांची तरतूद आहे.(प्रतिनिधी)