बिल्डरचा ‘रात्रीस खेळ चाले’
By admin | Published: July 4, 2017 03:39 AM2017-07-04T03:39:03+5:302017-07-04T03:39:03+5:30
विकासनगर येथील इंदिरा कॉलनी भागातील महापालिकेने चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून डांबरीकरण केलेला रस्ता एका बांधकाम व्यावसायिकाने
लोकमत न्यूज नेटवर्क
किवळे : विकासनगर येथील इंदिरा कॉलनी भागातील महापालिकेने चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्चून डांबरीकरण केलेला रस्ता एका बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या कोणत्याही विभागाची पूर्वपरवानगी न घेता शनिवारी रात्री सुमारे तीनशे फूट रस्ता खोदल्याच्या प्रकार उघड झाला आहे. स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यानंतर संबंधित व्यावसायिकाने खोदल्याची नागरिकांसमोर चूक कबूल करीत सकाळी चूक दुरूस्तीचा प्रयत्न केला. सकाळी घाईघाईत रस्ता बुजविण्याचे काम केले.
विकासनगर भागातील इंदिरा कॉलनी भागात एका बांधकाम व्यावसायिकाने एका मोठ्या इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. बांधकाम केलेल्या इमारतीसमोर महापालिकेची भुयारी गटार योजनेची वाहिनी असताना त्याठिकाणी जोड देण्याऐवजी संबंधित इमारतीपासून इंदिरा कॉलनीतील सुमारे दोनशे फूट मुख्य रस्ता खोदण्यास शनिवारी रात्री सुरुवात केली, नागरिकांना सुरुवातीला महापालिकेचे काम असल्याचे भासविण्यात आले. खोदकाम करणारा यंत्र चालक नागरिकांनाच दमबाजी करीत होता. नागरिकांनी त्यास रस्ता खोदण्याची परवानगी काढली आहे का? असा जाब विचारला. त्यानंतर त्याने काम थांबवून संबंधित बांधकाम व्यावसायिकास कळविले.
दरम्यान महापालिकेचे काम रात्री उशिरा कसे सुरु ठेवले याबाबत काहींना शंका आल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दूरध्वनीवरून चौकशी केली असता रस्ता खोदण्यास परवानगी दिली नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नागरिकांनीच काम ताबडतोब थांबवावे, रस्ता पुर्ववत तयार करून द्यावा, असे त्यास सुनावले. नागरिकांचा वाढता विरोध लक्षात घेऊन संबंधित बांधकाम व्यावसायिकाने रस्त्याचे खोदकाम बंद करून झालेली चूक मान्य करीत खोदलेला रस्ता माती टाकून रातोरात बुजवून टाकला असून रविवारी सकाळी खोदलेल्या रस्त्यावर खडी व सिमेंट टाकून खडे बुजविण्याचा त्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे संबंधितांवर महापालिकेने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे अरुण गोंटे, गणेश चव्हाण, रविंद्र कडू, राजेश मांढरे, अरुण आंबेकर, नितीन कुऱ्हाडे, संतोष नाईक, गणेश गपट, संदीप आगळे, अजय रॉय, लेखराज कोहली, जयेश कवडे आदी नागरिकांनी केली आहे.
किवळे येथे बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेचा रस्ता खोदला. अशी तक्रार नागरिकांकडून प्राप्त झाली. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने महापालिकेच्या भुयारी गटाराला जोड देण्याबाबत विचारणा केली होती . मात्र त्यासाठी रितसर परवानगी पालिकेकडून देण्यात आलेली नव्हती
- एस डी बंडगर, अभियंता,
भुयारी गटार विभाग, अ क्षेत्रीय कार्यालय
महापालिकेच्या स्थापत्य विभागाने रस्ता खोदण्याची परवानगी दिलेली नसून रस्ता अनधिकृतपणे खोदला असल्याने योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकाकडून महापालिका नुकसान भरपाई वसूल करणार आहे.
- एच पी बन्सल, उपअभियंता , स्थापत्य विभाग, अ क्षेत्रीय कार्यालय