बिल्डर वाधवानींस न्यायालयीन कोठडी, पोलीस कोठडीची मुदत संपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 01:37 AM2017-12-26T01:37:44+5:302017-12-26T01:37:47+5:30
पिंपरी : जमिनीचे बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी चिंचवडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नरेश ठाकुरदास वाधवानी यांच्यावर गुन्हा दाखल करून शनिवारी अटक केली.
पिंपरी : जमिनीचे बनावट खरेदीखत केल्याप्रकरणी चिंचवडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक नरेश ठाकुरदास वाधवानी यांच्यावर गुन्हा दाखल करून शनिवारी अटक केली. दुसºया दिवशी कोर्टात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पालीस कोठडीची मुदत संपताच पोलिसांनी सोमवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
पिंपरी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी बिल्डर वाधवानी यांना पोलीस कोठडीत ठेवले. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
बनावट खरेदीखत प्रकरणी वाधवानी यांच्यासह तीन आरोपींपैकी विजय रामचंदानी व महेश क्रिपलानी या दोघांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यांना पोलीस आणि न्यायालयीन कोठडीही देण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी नरेश वाधवानी मात्र अटकपूर्व जामीन मिळविण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळविता न आल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ७ डिसेंबर २०१७ ला मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यांनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मिळाली होती. ही मुदत २१ डिसेंबरला संपली. त्यामुळे शनिवारी त्यांना अटक केली.
>फसवणूक : निधनानंतर ४ वर्षांनी खरेदीखत
स्वर्गीय महादेव हरी कढे यांच्या नावे असलेली पिंपळे सौदागर येथील सर्व्हे क्रमांक ३९/२/२ येथील जमीन श्रद्धा असोसिएट्स व भागीदार संस्थेला २००६ मध्ये विकसित करण्यासाठी दिली होती. ३१ आॅक्टोबर २००७ ला जमीन मालक कढे यांचा मृत्यू झाला. पिंपळे सौदागर येथील या जागेचे मंगलमूर्ती डेव्हलपर्सचे नरेश वाधवानी, तसेच विजय रामचंदानी व महेश क्रिपलानी यांनी संगनमताने कढे यांच्या निधनानंतर ४ वर्षांनी अर्थात २०१० मध्ये बनावट खरेदीखत केले.
हयात नसलेल्या व्यक्तीच्या नावे बनावट सही करून खरेदीखत केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक वाधवानी यांच्यासह वकील विजय रामचंदानी व महेश क्रिपलानी यांच्याविरुद्ध शांताराम बर्डे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. २०१५ मध्ये चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पिंपरी न्यायालयाने याप्रकरणी चौकशी करून पुढील कारवाई करण्याचा आदेश चिंचवड पोलिसांना दिला होता. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाईसाठी त्यांना न्यायालयात हजर केले होते.