बिल्डर मस्त अन् असुविधांनी नागरिक त्रस्त, ‘‘ऐश्वर्यंम हमारा’’ प्रकल्प आता झाला नकोसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 04:07 PM2021-08-03T16:07:41+5:302021-08-03T16:16:39+5:30
पंचतारांकित अॅमिनिटीची स्वप्ने दाखवून पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली मोशी येथील ‘‘ऐश्वर्यंम हमारा’’या प्रकल्पातून सदनिकाधारकांची फसवणूक केली जात आहे.
पिंपरी : पंचतारांकित अॅमिनिटीची स्वप्ने दाखवून पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली मोशी येथील ‘‘ऐश्वर्यंम हमारा’’या प्रकल्पातून सदनिकाधारकांची फसवणूक केली जात आहे. ताबा मिळाल्यानंतरही अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. प्यायला पाणी नाही, सोलर सिस्टीम आणि गॅसची पाईपलाईन बसविलेलीच नाही. स्विमिंग पूल, गार्डन आणि मंदिर हे माहितीपुस्तकातच आहे. विविध समस्यांनी येथील सदनिकाधारक ग्रासले आहेत. त्यामुळे ‘‘ऐश्वर्यंम हमारा’’ आता येथील नागरिकांना नकोसा झाला आहे. ऐश्वर्यंम म्हणजे वैभव. मात्र, नाव मोठं लक्षण खोट...हे या प्रकल्पावरून दिसून येतं.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत चिखली गट क्रमांक ९४ मध्ये ‘‘द होम ऑफ कम्युनिटी लिव्हींग या गोंडस नावाखाली एश्वर्यंम हमारा प्रकल्प एक आणि प्रकल्प दोन साकारला जात आहे. एकूण १३ इमारतींचा प्रकल्प असून त्यापैकी ६ इमारतीमध्ये नागरीक राहायला आले आहेत. या प्रकल्पाची सुरूवात २०१७ मध्ये करण्यात आली. २१३२ सदनिकांचा हा प्रकल्प आहे. १०२० सदनिका नागरिकांच्या ताब्यात दिल्या आहेत. तसेच पीपीपी तत्वावर महापालिकेच्या भागिदारीतून ८२२ सदनिका दिल्या जाणार आहेत. मात्र, या प्रकल्पांत सुविधांचा प्रचंड अभाव असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांमध्ये चीड
उच्च जीवनशैलीवर आधारित स्वस्त घरकुल अशी जाहिरातबाजी या प्रकल्पात करण्यात आली आहे. लोकमतच्या टीमने प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, तसेच येथील रहिवाश्यांशी संबंधित चर्चा केल्यानंतर अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. बांधकाम व्यावसायिक येथील नागरिकांच्या भावनांशी खेळल्याने प्रचंड चीड निर्माण झाल्याचे दिसून आले.
काय दिले आश्वासन
प्रकल्पांच्या माहितीपत्रकात १३ प्रकारांच्या अॅमिनीटी दाखविल्या असूून त्यात कॉॅमन अॅमिनिटी मध्ये स्केटींग रिंग, चेस बोर्ड, टद्बायसिकल पार्क, कम्युनिटी हॉल, पार्टी लॉन, बारबेक्यू काऊंन्टर, फुड सर्व्हिंग एरिया, हर्बल गार्डन, रूंद पाथवे, मिडीटीशेन पॅव्हेलिन, योगा लॉन दिले आहे. तर इतर अॅमिनिटीमध्ये नक्षत्र गार्डन, मेडीटेशन हॉल, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्न प्ले पार्क, ट्री पीट, मल्टीपर्पज ओपन कोर्ट अॅडव्हेंचर वॉल, जिम्नेशियम हॉल, स्विमिंग पूल, कीडस् पूल, आऊटडोअर शौवर, आऊटडोअर गेम, ओपन स्पेस, नाना - नाणी पार्क, गॅस पाईपलाईन अशा अॅमिनिटी देणार असल्याचे आश्वासन दिले होत.
कोणत्या गोष्टींचा अभाव
सोलर पॅनल दिले नाहीत. गॅसची पाईप लाईन नाही. स्वीमींग पूल अर्धवट आहे. गार्डन, मंदिर पूर्ण नाही. पार्किंगमध्ये वीज नाही. पूर्णत्वाचा दाखला नसल्याने पिण्याचे महापालिकेचे पिण्याचे पाणी नाही. तसेच वॉटर ट्रिटमेंट प्लॉन आणि मैला शुद्धिकरण प्रकल्पाचा अभाव. पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जाते.