बांधकाम नियमितीकरण, शास्तीमाफी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 12:07 AM2019-01-09T00:07:45+5:302019-01-09T00:08:00+5:30

मुख्यमंत्री आज उद्योगनगरीत : पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन; प्रलंबित प्रश्नांवर तोडग्याची अपेक्षा

Building Regulatory, When Is It Understanding? | बांधकाम नियमितीकरण, शास्तीमाफी कधी?

बांधकाम नियमितीकरण, शास्तीमाफी कधी?

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शहरवासीयांनी भाजपाला सत्ता दिली. मात्र, अनधिकृत बांधकाम नियमितीकरण, शंभर टक्के शास्तीकर माफी हे प्रश्न कधी सोडविले जाणार असा सवाल पिंपरी-चिंचवडकर करीत आहेत. पोलीस आयुक्तालय इमारतीच्या उद्घाटनाला येणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

गेल्या विधानसभेपूर्वी भाजपाने शंभर दिवसांत अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, शहराचा स्मार्ट सिटीत समावेश, शंभर टक्के शास्तीकर माफी, रेड झोनमधील बांधकामे नियमितीकरण, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय अशी विविध आश्वासने दिली होती. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी भरभरून मतदान करून भाजपाच्या हाती सत्ता दिली होती. त्यापैकी पोलीस आयुक्तालय, शहराचा स्मार्ट सिटीत समावेश हे आश्वासन पूर्ण झाले आहे, तर अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाला न्यायालयात खोडा बसला आहे. शहरातील अनधिकृत बांधकामावर शंभर टक्के शास्तीकर माफीऐवजी सहाशेपर्यंत करमाफी अशी टूम भाजपाने काढली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, शंभर टक्के शास्तीकर माफी हे प्रश्न अधांतरीच राहिले आहेत. तसेच रेड झोनमधील बांधकामे नियमितीकरण, पवना-इंद्रायणी नदीसुधार प्रकल्प, पिंपरी ते चाकण मेट्रो असे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. भाजपाने दिलेली आश्वासने पूर्ण होणार कधी, असा प्रश्न शहरवासीय विचारत आहेत.

प्रलंबित असलेले प्रश्न
पवना, मुळा इंद्रायणी नदीसुधार
पहिल्या टप्प्यातच निगडीपर्यंत मेट्रो
अनधिकृत बांधकामे शास्तीकर शंभर टक्के माफी
रेडझोनमधील बांधकामे नियमितीकरण
एमआयडीसी, प्राधिकरणातील बांधकामांचे नियमितीकरण


केवळ ४५ टक्के पोलीस अन् अवघ्या
५२ वाहनांद्वारे गुन्हेगारी नियंत्रणाची कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : शहरात झालेल्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी ४,६०० पदे मंजूर आहेत. आतापर्यंत ५० टक्केपेक्षा कमी म्हणजे दोन हजार पोलीस उपलब्ध झाले असून, चारचाकी, दोन चाकी मिळून अवघी ५२ वाहने आयुक्तालयाच्या ताफ्यात आहेत. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज १५ आॅगस्टपासून सुरू झाले. या वेळी चारचाकी वाहने २२३ आणि चारचाकी १४३ अशी मिळून ३६६ वाहनांची आवश्यकता आहे. त्यापैकी केवळ ५२ वाहने सध्या उपलब्ध आहेत. १५ पोलीस ठाण्यांचा समावेश असलेल्या या आयुक्तालयास मनुष्यबळासह वाहनांची कमतरता जाणवत असल्याने कसरतीचे कामकाज करावे लागत आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. महापालिकेने चिंचवड प्रेमलोक पार्क येथील शाळेची इमारत आयुक्तालयासाठी उपलब्ध करून दिली आहे. भाडेपट्ट्यावर तात्पुरत्या स्वरूपात या इमारतीत आयुक्तालयाचे कामकाज सुरू झाले आहे. काही विभाग अद्याप सुरू होऊ शकलेले नाहीत. बॉम्बशोधक पथक, सायबर लॅब, तसेच आरोपींना न्यायालयात नेण्यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.

चाकणच्या म्हाळुंगेत नवीन पोलीस चौकी
४ चाकणचा परिसर मोठा आहे. या भागात चाकण ही केवळ एकमेव पोलीस चौकी आहे. तेथील एमआयडीसी परिसरात म्हाळुंगेत नव्याने पोलीस चौकी सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. मंजुरी मिळताच, त्या ठिकाणी लवकरच पोलीस चौकी सुरू करता येईल, असेही अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले.

Web Title: Building Regulatory, When Is It Understanding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.