गुंठामंत्र्यांच्या मुलांमध्ये बुलेटची क्रेझ, हुल्लडबाजांचा नागरिकांना नाहक त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 12:39 AM2019-04-01T00:39:27+5:302019-04-01T00:41:01+5:30
जमिनीला सोन्याचे भाव :
मोशी : शहरालगतच्या ग्रामीण भागातील जमिनींना सोन्याचे भाव आले. जागा विक्रीतून गाववाल्यांपैकी अनेकांकडे बक्कळ पैसा हाती आला. अशा गुंठामंत्र्यांची मुले सध्या मोटारी आणि महागड्या मोटारी घेऊन फिरू लागली आहेत. महागड्या मोटारी, दुचाकी घेऊन मिरवणाऱ्या बुलेट क्रेझवाल्या तरुणांच्या वर्तणुकीचा त्रास इतरांना होऊ लागला आहे. पोलिसांनी अशा हुल्लडबाजांना आवर घालावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
मोशी, चºहोली, दिघी, चिखली आदी परिसरातील तरुण वर्गात बुलेट गाड्यांची क्रेझ आहे. विचित्र, कर्णकर्कश आवाजातील हॉर्न वाजवत तरुणांची टोळकी परिसरात वावरत असतात. शाळा, महाविद्यालयाजवळ बुलेटवर स्वार झालेले तरुण घोळक्याने येतात.
सार्वजनिक ठिकाणी, रात्री-अपरात्री, चौका चौकांत, शाळा, महाविद्यालय परिसरात इंप्रेशन मारण्यासाठी तरुण बुलेट घेऊन येतात. मोठ्याने हॉर्न वाजवले जातात. फटाक्यासारखा फट फट असा मोठा आवाज सायलेन्सरमधून बाहेर पडत असताना, आरडा ओरडा करत तरुण परिसरात घिरट्या मारतात. त्यामुळे परिसरात राहणारे अबालवृद्ध दचकतात. वादाचा प्रसंग उद्भवू नये, यासाठी टोळक्याने फिरून हुल्लडबाजी करणाऱ्या या टोळक्यांना कोणी हटकण्याचा प्रयत्न करत नाही. पोलिसांनी अशा हुल्लडबाजांना आवर घालावी, अशी अपेक्षा तेथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.