सायंकाळी चायनीजची गाडी लावायचा अन् मध्यरात्री सावकारीसाठी घरफोडी करायचा; ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 08:26 PM2021-08-30T20:26:09+5:302021-08-30T20:27:55+5:30
चिंचवड, भोसरी आणि चिखली परिसरात घरफोड्या केल्याचे केले कबूल; ३० गुन्हे उघडकीस
पिंपरी : चोरी करण्यासाठी चोरटा दिवसा तसेच रात्रीही घराची पाहणी करायचा. त्यानंतर घरफोडी करून त्यातून मिळालेल्या पैशांतून सावकारी करायचा. या सावकारीच्या कर्जातून व्याजापोटी एका कर्जदाराकडून त्याने महागडे चारचाकी वाहन घेतले. घरफोडी करणाऱ्या या चोरट्याला चिंचवड पोलिसांनीअटक केली. त्याच्याकडून ७७ लाख ४७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
लखन अशोक जेटीथोर (वय ३२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. सोलापूर), असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह रवी शिवाजी भोसले (वय ४२, रा. रहाटणी. मूळ रा. सोलापूर), सुरेश नारायण जाधव (वय ४२, रा. रहाटणी. मूळ रा. सातारा) यांना देखील अटक केली. त्यांचा चौथा साथीदार कृष्णा जाधव फरार आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लखन हा गुरुव्दारा चौकात सायंकाळी चायनीजची गाडी लावत होता. दिवसा बंद घरांची पाहणी करत होता. रात्री देखील ती घरे बंद असल्याची खात्री करत असे. त्यानंतर त्याच्या सोयीने घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे लखन आजूबाजूच्या परिसरात अडगळीच्या ठिकाणी टाकत असे. मध्यरात्री दोननंतर तो घरफोडी करत असे. घरफोडीच्या घटना वाढल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित व्यक्ती मास्क लावून जात असताना दिसली. मात्र एका विशिष्ट ठिकाणी गेल्यावर संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळत नसे. त्यामुळे पोलिसांनी संशयित व्यक्तीची माहिती काढून ओळख पटवली.
आरोपी लखन याच्यावर २००९ ते २०१२ या कालावधीत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सदर बाजार आणि फौजदारचावडी पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे लखनला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले. घरफोडी करून तो त्याच परिसरात त्याचा साथीदार कृष्णा जाधव याच्याकडे जाऊन झोपत होता, असे लखन याने पोलिसांना सांगितले. चिंचवड, भोसरी आणि चिखली परिसरात घरफोड्या केल्याचे कबूल केले.
चोरीचे दागिने विकून घ्यायचा होता फ्लॅट
आरोपी लखन हा घरफोडी करून चोरलेला माल त्याचे साथीदार आरोपी रवी आणि सुरेश यांच्या मदतीने विकत असे. लॉकडाऊनच्या कालावधीत चोरीचा माल विकला गेला नाही. तसेच चोरीचा माल विकून मिळालेल्या पैशांतून आरोपी लखन हा सावकारीचा व्यवसाय करीत असे. त्यातून त्याने एकाला दिलेल्या कर्जाचे व्याज मिळाले नाही. त्यामुळे त्या कर्जदाराकडून महागडे चारचाकी वाहन आरोपी लखन घेऊन आला होता. तसेच चोरीचे दागिने विकून आरोपी लखन हा फ्लॅट घ्यायच्या तयारीत होता. चोरी केलेले ७८ तोळे सोने, १० टीव्ही, गुन्ह्यासाठी वापरलेली महागडी गाडी, असा एकूण ७७ लाख ४७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चिंचवड पोलिसांनी जप्त केला.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे, सहाय्यक निरीक्षक राजु ठुबल, उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, सहाय्यक फौजदार पांडुरंग जगताप, पोलीस कर्मचारी स्वप्निल शेलार, वृषिकेत पाटील, राजू जाधव, विजयकुमार आखाडे, नितीन राठोड, पंकज भदाणे, अमोल माने, गोविंद डोके, सदानंद रुद्राक्षे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.