बस स्थानक की जाहिरात केंद्र, राजरोसपणे चिकटविली जातात पत्रके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:32 AM2017-11-21T01:32:06+5:302017-11-21T01:32:16+5:30
पिंपरी-चिंचवड शहरातील पीमपीएलच्या अनेक बसथांब्यांवर जाहिराती चिकटविल्या जात आहेत. त्यामुळे बसथांब्यांचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येते.
सांगवी : पिंपरी-चिंचवड शहरातील पीमपीएलच्या अनेक बसथांब्यांवर जाहिराती चिकटविल्या जात आहेत. त्यामुळे बसथांब्यांचे विद्रुपीकरण होत असल्याचे दिसून येते. शहरात पीएमपी या सार्वजनिक बस सेवेचे मोठे जाळे आहे. शहरासह लगतच्या गावांमध्ये जाण्यासाठी प्रवाशांना या बसेसचा मोठा आधार असतो. विविध मार्गांवर धावणाºया या बसेससाठी ठिकठिकाणी थांबे निश्चित करण्यात आले आहेत. या थांब्यांवर प्रवाशांना बसण्यासाठी शेडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. काही ठिकाणचे शेड मोडकळीस आले आहेत. तर काही ठिकाणी नवीन करकरीत शेड उभारले आहेत. मात्र, जुने शेड असो अथवा नवीन या शेडवर विविध प्रकारच्या जाहिराती चिकटविलेल्या दिसून येत आहेत. बसथांब्यावर जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी जाहिरात लावलेली असते. यामुळे बसथांब्यांचे विदु्रपीकरण झाले आहे.
सांगवीतील नवी सांगवी आणि जुनी सांगवी तसेच पिंपळे गुरव येथील मुख्य बस स्थानक परिसरातील प्रत्येक थांब्याकरिता असलेल्या बस स्थानकांची स्थिती सारखीच दिसून येते. निगडीतील लोकमान्य टिळक चौकात असलेल्या बस स्थानकावरही अशाच प्रकारे विविध जाहिराती चिकटविलेल्या दिसून येतात. हीच स्थिती पिंपरी, चिंचवड, भोसरी, तळवडे, कासारवाडी, नेहरुनगर, रावेत, रहाटणी, वाकड, थेरगाव आदी ठिकाणी पहायला मिळत आहे.
विनापरवानगी जाहिराती चिकटविणे बेकायदेशीर आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचा स्वतंत्र विभाग आहे. तरीही सर्रासपणे ठिकठिकाणी जाहिरती झळकत असतात. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.
या जाहिराती स्थानिक असल्याचे येथील लावलेल्या जाहिरातीतून दिसून येते. त्यावर असलेल्या फोन क्रमांकावर संपर्क करून पालिकेकडून कारवाई केल्यास अशाप्रकारे बस स्थानक विद्रूप करणाºयांना चाप बसेल, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पालिकेकडून अशा अनधिकृत जाहिराती लावणाºयांविरोधात कारवाई करावी, अशी परिसरातील नागरिकांनी मागणी केली आहे.
या जाहिरातीमुळे शेडचा मूळ रंगही लवकर लक्षात येत नाही. काही ठिकाणी तर अक्षरश: एकावर एक आठ ते दहा जाहिराती चिकटविलेल्या असतात. यासह जुन्या अनेक दिवसांपूर्वीच्या जाहिरातीही महिनोनमहिने तशाच झळकत असतात. या बेकायदेशीर जाहिराती हटविण्याबाबतची तसदी संबंधित यंत्रणेकडून घेतली जात नाही. त्यामुळे बसथांब्याच्या विदु्रपीकरणात भर पडत आहे.
सध्या शहरात ठिकठिकाणी नव्याने उभारण्यात आलेल्या काही बस स्थानकांवर संबंधित बस स्थानकावरून जाणाºया बसेसचे वेळापत्रक लावले आहे. त्यावर बसची वेळही नमूद असते. यामुळे प्रवाशांची सोय होते. मात्र, काही बहाद्दरांनी या वेळापत्रकावर देखील जाहिराती चिकटविल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसचे वेळापत्रक न समजल्याने धांदल उडते.