पिंपरीत फायनान्सच्या कार्यालयाची तोडफोड करून व्यावसायिकाला भरदिवसा लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 05:25 PM2022-03-15T17:25:59+5:302022-03-15T17:28:23+5:30
रविवारी सायंकाळी साडेपाच ते सहा या कालावधीत ही घटना घडली
पिंपरी : कोयता, दांडके व दगड मारून फायनान्सच्या कार्यालयाचे नुकसान केले. त्याचा जाब विचारला असता व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड काढून घेतली. पोलिसांनी आठ जणांच्या विरोधात दरोडाप्रकरणी गुन्हा दाखल केला. पिंपरीतील रिव्हर रोड येथील बौद्धनगर कमानीजवळ पीएस फायनान्स कार्यालय येथे रविवारी (दि. १३) सायंकाळी साडेपाच ते सहा या कालावधीत ही घटना घडली.
प्रमोद दत्तात्रय साबळे (वय ३१, रा. बौध्दनगर, पिंपरी) यांनी सोमवारी (दि. १४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. बाळ्या ओगले (वय २२), काळ्या उर्फ प्रकाश मगर (वय २५ ), शुभम घरवाडवे (वय २५, तिघेही रा. अशोकनगर, रिव्हर रोड, पिंपरी), मुन्या उर्फ महेश चंदनशिवे (वय २७), संजय गजानन मुरगुडे (वय २१, दोघेही रा. चिखली) आणि त्यांचे दोन ते तीन अनोळखी साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यातील आरोपी संजय मुरगुडे याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीतील रिव्हर रोड येथे बौध्दनगर कमानीजवळ फिर्यादीच्या पीएस फायनान्सचे कार्यालय आहे. आरोपींनी या कार्यालयाच्या काचेवर, शटरवर लोखंडी कोयते, लाकडी दांडके व दगड मारून तोडफोड करीत होते. त्यामुळे फिर्यादी त्यांच्या कार्यालयाजवळ गेले. ऑफिसचे नुकसान का करीत आहात, असे फिर्यादीने आरोपींना विचारले. तू लोकांना व्याजाने पैसे देतो, चांगले पैसे कमावतो, तुला जर येथे धंदा करायचा असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे आरोपी चंदनशिवे म्हणाला. कसले पैसे, असे फिर्यादीने विचारले. याच्या खिशात असतील तेवढे पैसे काढून घ्या, असे म्हणून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली.
तसेच फिर्यादीच्या खिशातील अकराशे रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. कोयत्याचा धाक दाखवून आरोपींनी पुन्हा शिवीगाळ केली. पोलिसांत तक्रार केली तर बघ, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या हातातील कोयते, दांडके हवेत फिरवत तसेच रस्त्यावरील हातगाड्यांवर मारत निघून गेले.