मुख्यमंत्र्यांना बोलवा, ते आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही, मनोरुग्णाने रोखली ३ तास वाहतूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 07:54 PM2023-09-01T19:54:02+5:302023-09-01T19:54:28+5:30
मनोरुग्ण छतावरून येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांवर तसेच प्रवासी आणि पोलिसांवर विटांचा भाडीमार करत होता
तळेगाव दाभाडे : मुख्यमंत्र्यांना बोलवा, ते आल्याशिवाय मी खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेत मनोरुग्ण तरुणाने शुक्रवारी तळेगाव स्टेशन येथील वाहतूक सुमारे तीन तास रोखून धरली. मनोरुग्णाने छतावरून येणाऱ्या - जाणाऱ्या वाहनांवर तसेच प्रवासी आणि पोलिसांवर विटांचा भाडीमार केला. यामुळे गोंधळ उडाला होता. तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर मनोरुग्णाला ताब्यात घेण्यात पोलीस प्रशासनास यश आले. रवी अशोक मुंडे (वय ३२,रा. वाशिम) असे मनोरुग्णाचे नाव आहे.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दुर्गानाथ साळी व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मदतीसाठी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेची आपत्ती व्यवस्थापन टीमला बोलावून घेतले. वन्यजीव रक्षक मावळचे संस्थापक नीलेश गराडे व विक्रम नखाते यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन बंब आणि पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.हातात लोखंडी रॉड असलेला मनोरुग्ण कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो स्वतःच्या जीवाचे काहीही करू शकत होता. त्याला रोखण्यासाठी अग्निशमन बंबातून पाण्याचे फवारे मारण्यात आले. खबरदारी म्हणून जुन्या आणि नवीन रेल्वे पुलाच्यामध्ये संरक्षक जाळी अंथरण्यात आली होती. संधीचा फायदा घेत भास्कर माळी व गणेश पाटील हे वाहतूक पोलिस चौकीच्या छतावर चढले .त्यांनी मोठ्या कौशल्याने मनोरुग्णाला खाली घेण्यात यश मिळविले.