Pune | १०८ ला लावला फोन, १० मिनिटं वेटिंगलाच ठेवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 03:09 PM2023-01-03T15:09:14+5:302023-01-03T15:09:48+5:30
१० मिनिटांत मदत मिळणे अपेक्षित असताना फोन वेटिंगवरच राहिल्याने प्रवाशी संतप्त झाले होते...
पिंपरी :पिंपरी-चिंचवड येथील नाशिक फाटा येथे एसटी बसचालकाला चक्कर आली. प्रसंगावधान राखत त्यांनी तत्काळ बस बाजूला घेत थांबवली. वाहक आणि प्रवाशांनी अस्वस्थ चालकास बाहेर फूटपाथवर आणून त्यांचे हात-पाय चोळू लागले. दरम्यान, एका दुचाकीस्वाराने १०८ क्रमांकावर फोन लावला. फोन तत्काळ उचलला मात्र, ॲम्ब्युलन्स विभागाला देतो म्हणत फोन ट्रान्सफर केला. यासाठी सुमारे १० मिनिटांचा कालावधी गेला. १० मिनिटांत मदत मिळणे अपेक्षित असताना फोन वेटिंगवरच राहिल्याने प्रवाशी संतप्त झाले होते.
अधिक माहितीनुसार, धारूर आगाराची पुणे ते किल्ले धारूर ही बार्शी, कळंब आणि केजमार्गे जाणारी बस पिंपरी चिंचवडच्या वल्लभनगर आगारात रात्री आली होती. ती साडेदहाच्या सुमारास परतीच्या मार्गावर निघाली. मात्र, तेथून काही अंतरावर असलेल्या नाशिक फाटा येथे चालकास अस्वस्थ वाटू लागले. त्यांचे हात थरथरू लागले. त्यांना चक्कर येऊ लागली. मात्र, प्रसंगावधान राखत चालकाने बस बाजूला घेऊन थांबविली. वाहक आणि प्रवाशांनी त्यांना बसबाहेर काढले. फुटपाथवर झोपवून त्यांची छाती, हात-पाय चोळले. पाणी पाजले. त्यानंतर चालकास बरे वाटू लागले.
दरम्यान, हा प्रकार पाहून एका दुचाकीस्वाराने आपत्कालीन उपयोगासाठी असलेल्या १०८ या क्रमांकावर फोन लावला. फोन पहिल्या पाच रिंगमध्ये उचलला. त्यांनी माहिती घेऊन फोन ॲम्ब्युलन्स विभागाकडे देतो म्हणत, ट्रान्सफर केला. त्यानंतर फोनचा वेटिंग काळ सुमारे १० मिनिटांचा होता. या काळात उपचार केल्याने चालकाला बरे वाटू लागले होते. ते उठून बसले. ‘आता बरे वाटत असून कोणाला बोलावण्याची गरज नाही’, असे त्यांनी सांगितले. वाहकाने त्यांच्यासाठी ज्यूस आणला. तो पिल्यानंतर आता मी बस नेण्यासाठी तयार असल्याचे चालकाने सांगितले. दरम्यान, १०८ क्रमांकाचाही आपत्कालीन स्थितीत काहीही उपयोग होत नसल्याचे दिसून आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
चालू बसच्या चालकाला चक्कर आल्याने प्रवाशी घाबरले होते. उशीर झाला तरी होऊ द्या. मात्र, रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र १५-२० मिनिटांनी त्यांना खूप बरे वाटू लागले. आपत्कालीन १०८ वर फोन लावला होता, मात्र १० मिनिट झाले तरी ॲम्ब्युलन्स विभागाला फोन जोडला गेला नाही. हा प्रकार वाईट आहे.
- एक प्रवासी