Pimpri Chinchwad: रंगकामासाठी आला आणि चार लाखाचे दागिने घेऊन गेला, गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Published: December 20, 2023 01:26 PM2023-12-20T13:26:10+5:302023-12-20T13:27:14+5:30
चिंचवड येथील कृष्णानगरमध्ये २९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी साडेतीन दरम्यान ही घटना घडली...
पिंपरी : रंगकाम करण्यासाठी आलेल्या पेंटरने घरातून दागिने आणि रोकड असा एकूण चार लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. चिंचवड येथील कृष्णानगरमध्ये २९ मार्च रोजी सकाळी ११ ते दुपारी साडेतीन दरम्यान ही घटना घडली.
रोहीत तानाजी काटकर (३४, रा. कृष्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. १९) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सुरज सिंग (रा. उत्तरप्रदेश) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काटकर यांच्या घरामध्ये रंगकाम सुरू होते. त्यावेळी सुरज सिंग हा पेंटिंग काम करत असताना त्याने घरातून ७९ ग्रॅम वजनाचे तीन लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण चार लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून घेऊन गेला, असे फिर्यादीत नमूद आहे.
नऊ महिन्यांनंतर गुन्हा दाखल
फिर्यादी रोहीत काटकर आणि सुरज सिंग हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. चोरीचा प्रकार घडल्यानंतर काटकर यांनी सुरज याच्याकडे विचारणा केली. मुद्देमाल परत करण्याची मागणी केली. मात्र, सुरज याने प्रतिसाद न दिल्याने काटकर यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी सुरज याला अटक केली.