पोलीस म्हणून आले...तिघांचे अपहरण केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 07:01 PM2018-05-22T19:01:14+5:302018-05-22T19:01:14+5:30
उत्तर प्रदेश येथील पोलीस आहोत न्यायालयात हजर राहण्यासाठी तिघांना तत्काळ घेऊन जाण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी : बावधन येथील पाटीलनगर येथे पोलीस असल्याची बतावणी करून एक महिला, पाच वर्षांचे बालक आणि एकजण अशा तिघांचे रविवारी दुपारी अपहरण करण्यात आले. राहत्या घरातून तिघांना पळवून नेण्याचा प्रकार घडला. दोन दिवस शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता व्यकतींचा शोध न लागल्याने २५ वर्षीय महिलेने सोमवारी हिंजवडी पोलिसांकडे दोन संशयित आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस म्हणून आलेल्या एख महिला व एक पुरुष यांच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निलभ रतन (वय २७), रोमा सिंग (वय २६) आणि दर्श (वय ५) अशी अपहरण झालेल्यांची नावे आहेत. रोमा सिंग हिचे पहिले लग्न झाले आहे. पहिल्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला असून त्यानंतर तिने निलब याच्याशी लग्न केले. रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अचानक चार ते पाचजण पोलिसांच्या वेशात आले. उत्तर प्रदेश येथील पोलीस असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश येथे रोमा सिंग आणि निलब यांच्यावर न्यायालयात दावा सुरु असल्याचे कारण सांगून न्यायालयात हजर राहण्यासाठी तत्काळ घेऊन जाण्यासाठी आल्याचे त्यांनी नमूद केले. रोमा सिंग आणि निलब तसेच पाच वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांना बळजबरीने मोटारीत बसवुन ते घेऊन गेले. याबाबत निलभ यांच्या बहिणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हिंजवडी पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला असता,रामा सिंग आणि निलब यांच्यावर संबंधित पोलिसांकडे गुन्हा दाखल नसल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच त्यांच्यावर न्यायालयात दावा सुरू नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पोलीस असल्याची बतावणी करून तिघांचे अपहरण केले असल्याचा संशय बळावला आहे. पोलीस वेशात आलेले ते नेमके कोण होते. त्यांनी या तीन लोकांचे अपहरण का केले या सगळ््या प्रश्नांच्या उत्तरासह हिंजवडी पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.