नादाला वय नसतं! सत्तरीच्या मधुकर पाचपुतेंच्या घोडेस्वारीचा अंगावर शहारा आणणारा क्षण कॅमेरॅत; VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 03:41 PM2022-02-14T15:41:09+5:302022-02-14T15:45:56+5:30
शर्यतीला सुरूवात झाली अन् मधुकर पाचपुते यांची अदाकारी सुरू झाली. घोडेस्वारी करतांना नाना पाचपुते यांची ती अदाकरी, तो थाट, एखाद्या विशितल्या पोरालाही लाजवेल, असाच चित्तथरारक होता.
ज्ञानेश्वर भंडारे -
पिंपरी - बैलगाडा शर्यती (Bullock cart race) पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. हे प्रयत्न कशासाठी होते याचे उत्तर मावळातील नाणोली घाटात झालेली शर्यत पाहिली की सर्वांना येईल. या वेळच्या बैलगाडा शर्यतीपेक्षा अधिक चर्चा आहे, ती चिंचोशीच्या नाना उर्फ मधुकर पाचपुते यांच्या घोडे सवारीची. नव्हे, या शर्यतीत तेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. त्यांच्या या अदाकारीचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
काडं अन् जोकाड जुंपली त्याच्यांपुढे घोडेस्वार म्हणून होते मधुकर नाना पाचपुते. वय 75 वर्षे. नाद महाराष्ट्राच्या मातीतला, अंगावर शहारे आणणारा क्षण. शर्यतीला सुरूवात झाली अन् मधुकर पाचपुते यांची अदाकारी सुरू झाली. घोडेस्वारी करतांना नाना पाचपुते यांची ती अदाकरी, तो थाट, एखाद्या विशितल्या पोरालाही लाजवेल, असाच चित्तथरारक होता. नाना पाचपुते यांच्या घोडीस्वारीचा क्षण उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. त्यांच्या अदाकारीला उपस्थित बैलगाडा शौकिनांनी टाळ्या-शिट्या वाजवून दाद दिली.
नादाला वय नसतं! सत्तरीच्या मधुकर पाचपुतेंच्या घोडेस्वारीचा अंगावर शहारा आणणारा VIDEO कॅमेरॅत...#Bullockcartrace#HorseRiding#MadhukarPachputepic.twitter.com/5bMyJk15d4
— Lokmat (@lokmat) February 14, 2022
लगाम न घालताही घोड्याला आवर, ही त्यांची खासियत -
बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्याने पुन्हा बैलगाडा शर्यती सुरू झाल्या आहेत. नुकतीच मावळातील नाणोलीच्या घाटात बैलगाडा शर्यत पार पडली. खेड तालुक्यातील चिंचोशी गावातील नाना पाचपुते (वय ७५) हे कळत्या वयापासूनच घोडेस्वारी करतात. आता ते सत्तरीत आहेत. घोडेस्वारीला सुरूवात करून त्यांना जवळपास ५० वर्षे झाली. बैलगाडीचा नाद अन् अंगात असलेला हौशीपणा यामुळे त्यांच्यात घोडेस्वारी मुरत गेली. पंचक्रोशीत कुठेही बैलगाडा शर्यत असली की तिथे मधुकर पाचपुते हजर असतात. लगाम न घालताही घोडीला आवरायचे कसब त्याच्यात असल्याने कितीही बेभान असलेली घोडी ते आवरतात.
यासंदर्भात बोलताना घोडेस्वार मधुकर (नाना) पाचपुते म्हणाले, १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर घोडा शर्यत सुरू झाली. शर्यत सुरू झाल्याने आनंदाला पारावर राहिला नाही. बैलगाडा शर्यत ही आमच्यासाठी जीव की प्राण. त्यामुळे घोडीवर बसून शर्यतीचे सारथ्य करणे हे जिकीरीचे असले तरीही त्यात मिळणाऱ्या आनंदाला सीमा नसते. परत शर्यती सुरू झाल्या अन आनंद व्दिगुणीत झाला.