भाजपा नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द, आयुक्तांनी झुगारला दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 05:58 AM2017-08-25T05:58:54+5:302017-08-25T05:58:57+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य कुंदन गायकवाड यांचा जातदाखला बुलडाणा पडताळणी समितीने अवैध ठरविल्याचा आदेश महापालिकेला मिळाला
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य कुंदन गायकवाड यांचा जातदाखला बुलडाणा पडताळणी समितीने अवैध ठरविल्याचा आदेश महापालिकेला मिळाला असून, त्यांचे पद रद्द केल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीमध्ये झाली. या निवडणुकीत कुंदन अंबादास गायकवाड चिखली प्रभाग क्रमांक एकमधून भाजपाच्या उमेदवारीवर विजयी झाले. त्यांनी कैकाडी जातीचा दाखला सादर करीत अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडणूक लढविली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे नितीन रोकडे यांनी गायकवाड यांच्या जातदाखला आणि जात प्रमाणपत्र पडताळणीवर हरकत घेतली. गायकवाड यांचा जातदाखला अवैध असल्याचा निर्णय बुलडाणा जिल्हा विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मंगळवारी दिला. जातपडताळणी समितीचा आदेश येऊनही गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यास पालिका अधिकारी टाळाटाळ होत होती.
भाजपाच्या तीन नगरसेवकांवर टांगती तलवार
नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे पद रद्द झाल्याने भाजपाला धक्का बसला आहे. तसेच राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपाच्या तीन नगरसेवकांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला सादर केला नाही. त्यांच्या वकिलांनी स्थगिती मिळाली असल्याचे पालिकेला दूरध्वनीवरून सांगितले आहे. दूरध्वनीवरच पालिकेच्या अधिकाºयांना कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, यशोदा बोईनवाड यांनी सहा महिने, कमल घोलप यांनी चार सप्टेंबरपर्यंत आणि मनीषा पवार यांनी चार महिन्यांच्या मुदतवाढीचा आदेश उच्च न्यायालयातून मिळविला आहे.
२२ आॅगस्टपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत होती. या मुदतीत चार जणांनी न्यायालयातून मुदतवाढीचा आदेश मिळविला. त्यांपैकी गायकवाड यांचे प्रमाणपत्र अवैध असल्याची माहिती निवडणूक विभागाला कळविली होती. या संदर्भातील आदेश प्राप्त झालेला नव्हता. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया म्हणून गायकवाड यांच्याबाबतच्या दाखल्याबाबत मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्याचे काम सुरू होते. अशा प्रकरणांमध्ये पडताळणी समितीच्या आदेशाला कोणी स्थगिती मिळविली आहे का, याबाबत कायदेशीर माहिती घेणे गरजेचे असते. त्यामुळे आज सायंकाळी गायकवाड यांचे पद रद्द केल्याचे आदेश पारित केले असून, कायदेशीर प्रक्रिया करण्यात येईल. - श्रावण हर्डीकर, आयुक्त