पिंपरी महापालिकेतील २८ लेखनिकांची बढती रद्द, खातेनिहाय चौकशीचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 03:09 PM2019-04-02T15:09:47+5:302019-04-02T15:24:27+5:30
पिंपरी महापालिका आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी वर्गातून लेखनिक पदावर बढती मिळविलेल्या ११७ कर्मचाऱ्यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले.
पिंपरी: महापालिका आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी वर्गातून लेखनिक पदावर बढती मिळविलेल्या कर्मचाऱ्यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे ११७ कर्मचाऱ्यांपैकी २८ लेखनिकांची बढती रद्द केली आहे, कर्मचाऱ्यांना चतुर्थश्रेणीत पदावनत करुन खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, सरकार दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचाऱ्यांची कमरतता जाणवत आहे. प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार लेखनीक पदावर बढती दिली. महापालिका आस्थापनेवरील वर्ग ४ मधील सुमारे ११७ कर्मचाऱ्यांना वर्ग ३ मधील लेखनीक पदावर बढती देण्याचा निर्णय प्रशासनाने काही दिवसांपूर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे ११७ कर्मचाऱ्यांना झाला. काही कर्मचाऱ्यांनी बढती मिळविण्यासाठी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची बाब निदर्शनास आली. बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांनी ही बढती मिळविल्याची तक्रार आयुक्तांकडे मिळाली. त्यामुळे सर्वच कर्मचाºयांचे प्रमाणपत्र राज्य परीक्षा परिषदेकडे खातरजमा करून घेण्यासाठी पाठविली. त्या कर्मचाऱ्यांचा अहवाल महापालिकेस मिळाला. मात्र, या अहवालात टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे याविषयी स्पष्ट माहिती परीक्षा परिषदेने दिली नाही. टंकलेखन प्रमाणपत्राची योग्य माहिती न दिल्याने महापालिका प्रशासनाला त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची अडचण आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना पत्र पाठविले. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिलेल्या बढतीत टंकलेखन प्रमाणपत्राची माहिती देण्यास परीक्षा मंडळ उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे परीक्षा मंडळाने स्पष्ट अभिप्राय देऊन हे टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे, याविषयी सविस्तर माहिती देण्याची विनंती पत्राद्वारे केली.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचा तपासणी अहवाल मिळाला. त्यात २८ कर्मचाऱ्यांचे टंकलेखन प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्या कर्मचाठयांना मुळ टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्यास वारंवार सांगूनही त्यांनी प्रशासनाकडे प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत. महापालिकेच्या या २८ कर्मचाऱ्यांनी बढतीवेळी टंकलेखनाच्या खोट्या छायांकित सत्यप्रती सादर करुन महापालिकेची फसवणूक केली, हे स्पष्ट झाले. त्यामुळे नियुक्ती आदेशातील अटी व शर्तींचा या कर्मचाऱ्यांनी भंग केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची लेखनीक पदावरील सेवा संपुष्टात आणली आहे. त्यांची बढतीपूर्वीच्या गट ड च्या मुळ पदावर वेतनश्रेणी पदावनत केली आहे.