४२५ कोटींच्या निविदा रद्द करा - शिवाजीराव आढळराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 03:11 AM2018-01-31T03:11:49+5:302018-01-31T03:12:06+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पुढाºयांनी व ठेकेदारांनी ४२५ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. ४२५ कोटींच्या कामांसाठी केलेल्या निविदा प्रक्रियेतील रिंगमुळे जादा दराच्या निविदा भरल्याने सुमारे सत्तर ते नव्वद कोटींचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पुढाºयांनी व ठेकेदारांनी ४२५ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. ४२५ कोटींच्या कामांसाठी केलेल्या निविदा प्रक्रियेतील रिंगमुळे जादा दराच्या निविदा भरल्याने सुमारे सत्तर ते नव्वद कोटींचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. जागा ताब्यात नसताना देखील कामाच्या वर्क आॅर्डर देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी या अगोदर संबंधित रस्ते कामाच्या निविदा त्वरित रद्द करावेत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने सव्वा चारशे कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे खासदारांच्या बैठकीत निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. पत्र देखील दिले होते. त्यामुळे आपण निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश द्याल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे घडले नसल्याने पालिकेतील सत्ताधारी आणि आयुक्तांनी वर्क आॅर्डर कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते.
महापालिकेला लुटण्याची परंपरा कायम
रस्ते विकासाच्या निविदा काढलेल्या अनेक जागा पालिकेच्या ताब्यात नाहीत. तसेच सव्वा चारशे कोटी रुपयांची चालू वर्षात आर्थिक तरतूद नसताना पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये करावयाच्या खर्चाच्या निविदा आता चालू आर्थिक वर्षात काढण्यात आल्या आहेत. सध्याच्या स्थायी समितीची मुदत पुढच्या महिन्यात संपत आहे. त्यामुळे घाईघाईने सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी जलद गतीने निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. पालिकेत सत्तेवर भाजपा असली तरी त्यांच्या आडून राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या नगरसवेकांनी महापालिकेला लुटण्याची पूर्वीची परंपरा कायम ठेवल्याचा आरोप आढळराव यांनी केला आहे.