रद्द केलेली प्रगती एक्सप्रेस पुन्हा धावणार; रेल्वे प्रवासी संघ पिंपरी-चिंचवड चा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 07:38 PM2019-11-08T19:38:54+5:302019-11-08T19:40:04+5:30
प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत ही गाडी येत्या ११ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे...
चिंचवड: नैसर्गिक आपत्तीमुळे खंडाळा घाट सेक्शनची भयंकर दुरावस्था झाली असल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने दिड महिन्यांपासून खंडाळा घाट सेक्शनच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असुन सदर काम सुमारे चार ते पाच महिने सुरु राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा न येण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द केलेल्या आहेत यात प्रगती एक्सप्रेस चाही समावेश करण्यात आला होता.मात्र नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी ही गाडी पुन्हा सुरू करावी अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाने केली होती.प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेत ही गाडी येत्या ११ नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मार्ग दुरुस्तीच्या कारणास्तव काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. सुमारे दहा ते बारा मेल एक्सप्रेस गाड्या रद्द केल्यामुळे पुणे, कोल्हापूर, भुसावळ, नांदेड, हुबळी, पनवेल, मुंबई इत्यादी दिशेकडुन येणा-या व जाणा-या प्रवाशांचे भयंकर हाल होत आहेत. तसेच पुणे दिशेकडुन पनवेल दिशेकडील नवी मुंबई, वाशी, बेलापुर, ठाणे इत्यादी ठिकाणी शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयांतील कर्मचारी वर्गास पनवेल मार्गे एकही मेल एक्सप्रेस गाडी सुरु नसल्यामुळे प्रचंड प्रमाणात शारीरिक, मानसिक त्रासासह आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत असल्याने रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवड यांनी पुणे मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस गाडी पुन्हा सुरु करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले. प्रगती एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष व सर्व सदस्य मागील पंधरा दिवसांपासुन मध्य रेल्वे प्रशासनातील संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गांच्या भेटीगाठी घेऊन प्रगती एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याबाबत प्रयत्न करत होते.प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे धावत असल्यामुळे पनवेल, बेलापुर, वाशी, ठाणे इत्यादी ठिकाणी शासकीय व खाजगी क्षेत्रात काम करणा-या रेल्वे प्रवाशांना लाभ होईल व त्यांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास कमी होईल तसेच संसार प्रपंच सांभाळुन तारेवरची कसरत करुन पुण्यावरुन पनवेल, मुंबई दिशेला नोकरी, व्यवसायानिमित्त येणा-या महिला प्रवाशांनाही प्रगती एक्सप्रेस सुरु झाल्यास घरी जाण्यास रात्री उशिर होणार नाही व त्या सर्व महिला वेळेत घरी पोहचतील.अशा अनेक बाबी रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष व सदस्य रेल्वेच्या अधिका-यांची व मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे ह्यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणुन देत होते. अखेर, रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवड यांच्या प्रयत्नांना यश आले असल्याचे संघाच्या पदाधिका?्यांनी कळविले आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे मुंबई पुणे प्रगती एक्सप्रेस ही गाडी दिनांक ११ नोव्हेंबर पासुन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रगती एक्सप्रेस सुरु होईपर्यंत डेक्कन क्विन ह्या गाडीला कर्जत रेल्वे स्थानकात एक मिनिटांचा थांबा दिला जाईल असेही कळविले आहे. प्रगती एक्सप्रेस पुन्हा सुरु करण्याबाबत रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष ईक्बाल भाईजान मुलाणी, उपाध्यक्ष शैलेंद्र पांडेय, सदस्या तथा महिला अध्यक्षा भारती कोळमकर, सदस्य प्रदिप जाधव, यादव बोरले, कोमल भावसार, गौतम मोरे, गोंविद नाईक, दिपक शेगर ह्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. पुणे मुंबई प्रवास करणा-या हजारो रेल्वे प्रवाशांनी रेल्वे प्रवासी संघ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष व सर्व सदस्यांचे मन:पुर्वक आभार मानले आहेत.