उमेदवारांनी प्रचारासाठी साधला रविवारचा मुहूर्त
By admin | Published: February 13, 2017 01:57 AM2017-02-13T01:57:29+5:302017-02-13T01:57:29+5:30
महापालिका निवडणूक दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, उर्वरित कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील
पिंपरी : महापालिका निवडणूक दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, उर्वरित कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार प्रयत्नशील आहेत. रविवारीदेखील सुटीचा मुहूर्त साधत उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेतल्या.
यंदा चार सदस्यीय प्रभागपद्धती असल्याने प्रभागाचा विस्तार वाढला आहे. यासह मतदार संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांना पायपीट करावी लागत आहे. प्रभागाची रचना काही दिवस आधी माहिती झाली असली, तरी अनेक इच्छुकांनी लगेचच प्रचाराला सुरुवात केली नाही. उमेदवारी मिळाल्यानंतर प्रचाराचे नियोजन करू या धोरणानुसार वाट पाहत होते. उमेदवारी मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला जोर आला. मात्र, कमी दिवसांचा कालावधी असल्याने मतदारांपर्यंत पोहोचताना कसरत करावी लागत आहे. सकाळी, संध्याकाळी पदफेरी काढून मतदारांच्या भेटी घेतल्या जात आहेत. रविवारी सुटीचा दिवस असल्याने उमेदवारांनी सकाळपासून प्रचाराला जोरदार सुरुवात केली. नोकरदार व्यक्ती रविवारी सुटीमुळे घरी असतात. त्यामुळे आठवडाभरात भेट न झालेल्यांची रविवारी भेट होऊ शकते या दृष्टीने उमेदवारांनी रविवारी जोरदार प्रचार केला. दाट लोकवस्तीचे भागांना प्राधान्य दिले. एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार प्रचार करताना दिसत होते. (प्रतिनिधी)