देहूरोडमध्ये इमारतीत मेणबत्तीमुळे आग
By admin | Published: May 4, 2017 02:28 AM2017-05-04T02:28:55+5:302017-05-04T02:28:55+5:30
येथील आबूशेठ रस्त्यावरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने वीजपुरवठा खंडित झाला असल्याने मेणबत्ती
देहूरोड : येथील आबूशेठ रस्त्यावरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने वीजपुरवठा खंडित झाला असल्याने मेणबत्ती पेटवून खिडकीत ठेवली असताना मेणबत्ती पडून आग लागल्याने समोरासमोरच्या दोन खोल्यांत राहणाऱ्या दोन कुटुंबांच्या घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले. तर दुसऱ्या कुटुंबातील एका महिलेला आगीचा व धुराचा त्रास सहन न झाल्याने देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक, तसेच आबूशेठ रस्त्यावरील व्यापारी बांधवांनी प्रयत्न केल्याने एका तासात आग आटोक्यात आली. आगीची घटना बुधवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
आयेशा आत्तार (वय अंदाजे २८) असे उपचार घेत असलेल्या महिलेचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, हरी निवास या कैलास गुप्ता यांची दुमजली इमारतीच्या मजल्यावर सरोदे व आत्तार हे भाडेकरू राहतात. दुपारी चारपासून देहूरोड व विकासनगर परिसरात विजेचा लपंडाव सुरु होता.
सायंकाळी पुन्हा वीज पुरवठा खंडित झाल्याने रात्री साडेसात-आठच्या सुमारास अनिता राहुल सरोदे (वय २५) या महिलेने खोलीच्या खिडकीत मेणबत्ती लावली होती . त्या तळमजल्यावर तांदूळ खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांना मेणबत्ती खाली पडल्याने आग लागली असल्याचे दिसले. आगीमुळे घरातील दूरदर्शन संच, तसेच कपडे व घरसामान जळत होते. समोरच असलेल्या आत्तार राहत असलेल्या खोलीतील घरसामान व कपड्यांनी पेट घेतला. आत्तार यांना त्रास झाल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (वार्ताहर)