आयटीनगरीत गांजाचा व्हायरस! हिंजवडी, वाकड आणि बावधनमध्ये पोलिसांच्या सर्वाधिक कारवाया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 12:50 PM2022-05-27T12:50:22+5:302022-05-27T12:55:01+5:30
शहरातील उच्चभ्र परिसराला अंमली पदार्थाच्या सेवनाचा विळखा...
- तेजस टवलारकर
पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात मागील काही दिवसांपासून अंमली पदार्थांची तस्करी वाढल्याचे दिसून येत आहे. विशेषत: शहरातील उच्चभ्रू भागात गांजा आणि अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याची स्थिती आहे.
वाकड, निगडी, बावधन, हिंजवडी या परिसरात गांजा आणि अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी सर्वाधिक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीसांतील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शहरात मागील पाच महिन्यात अंमली पदार्थ सेवन आणि बाळगल्याप्रकरणी ३३ गुन्हे दाखल झाले असून, ५७ आरोपींना पकडण्यात आले आहे.
शहरात शिक्षण घेणाऱ्यासाठी येणारे विद्यार्थी, आयटी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी याच परिसरात मोठ्या संख्येने राहतात. हाच वर्ग आपला ग्राहक बवनिण्यासाठी अंमली पदार्थ तस्कर प्रयत्न करीत असतात. विशेषत: तरूण वर्गाला हेरून त्यांच्या मार्फत अंमली पदार्थ पोहोचविले जातात. अंमली पदार्थांमध्ये गांजा हा सर्वात कमी किमतीत मिळतो. त्यामुळे गांज्यांचे सेवन करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अंमली पदार्थ विरोधी पथक कार्यरत आहे. या पथकामार्फत अंमली पदार्थ जवळ बाळगणाऱ्यांवर कारवाई केली जाते. मागील काही वर्षात शहराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर उद्योग व्यवसाय आहेत. परिणामी बाहेरून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे मागील काही वर्षात पिंपरी-चिंचवड अंमली पदार्थ तस्करांंचे महत्वाचे केंद्र बनल्याची स्थिती आहे.
शहरात या पदार्थांचे होते सेवन?
गांजा
ब्राऊन शुगर
मेफेड्रोन ( एमडी )
बंदी असलेल्या सिगारेट
तरूणांना केले जातेय लक्ष?
शहर परिसरात आतापर्यंत केलेल्या कारवाई २० ते ४५ या वयोगटातील व्यक्ती अंमली पदार्थांचे सेवन करताना आणि बाळगताना मिळून आले आहेत, अशी माहिती अंमली विरोधी पथकाने दिली. देशभरातील अनेक तरूण शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी पिंपरी-चिंचवड शहरात आले आहेत. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरूणांची संख्या शहरात जास्त आहे. या वर्गाला पगार देखील मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे अशा तरूणांना अंमली पदार्थ्यांचे सेवन करण्यासाठी लक्ष केले जात असल्याचे दिसून येतं.
येथून येतो शहरात गांजा
ओडिशा
कर्नाटक
आंध्रप्रदेश
शिरपूर
जळगाव