पिंपरीत गांजा विकला जातो किलोने; सापडतो मात्र ग्रॅम-ग्रॅमने, मुख्य सूत्रधार मोकाट...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 02:12 PM2022-05-29T14:12:10+5:302022-05-29T14:12:40+5:30

गांजा सहजपणे उपलब्ध होत असल्याने अनेक अल्पवयीन मुलेही या व्यसनाच्या आहारी जात आहेत

Cannabis is sold in Pimpri Chinchwad Found by gram gram the main facilitator Mokat | पिंपरीत गांजा विकला जातो किलोने; सापडतो मात्र ग्रॅम-ग्रॅमने, मुख्य सूत्रधार मोकाट...

पिंपरीत गांजा विकला जातो किलोने; सापडतो मात्र ग्रॅम-ग्रॅमने, मुख्य सूत्रधार मोकाट...

googlenewsNext

तेजस टवलारकर 

पिंपरी : गांजाची विक्री, साठवणूक तसेच वाहतुकीस पूर्णपणे प्रतिबंध आहे. तरीदेखील शहरात दररोज गांजा बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयांतर्गत अंमली पदार्थविरोधी पथकही स्थापन करण्यात आले. पथकाने शहरातील अंमली पदार्थ व्यापारावर लक्ष केंद्रित केले. मात्र, या पथकाच्या हातीही कधी तरीच मोठा साठा सापडतो. अनेकदा पाच ग्रॅम, दहा ग्रॅम गांजा जप्त अशीच कारवाई असते. मात्र, यामध्येही मुख्य सूत्रधार मोकाट राहत असल्याने कारवाई केल्यानंतरही गांजा तस्करी राजरोसपणे सुरूच आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बाहेरून गांजा आणला जातो. शहरातील अनेक भागात गांजा सहजपणे उपलब्ध होत असल्याने अनेक अल्पवयीन मुलेही या व्यसनाच्या आहारी जात आहेत. काही ठिकाणी तर गांजा हब तयार झाले आहे. गांजा तस्करीची साखळी तोडण्यासह मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

गांजा आणि अंमली पदार्थांचे रॅकेट चालविणाऱ्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचून कडक कारवाई करण्यात मात्र पोलिसांना यश येत नाही. कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यात जंगलांमध्ये गांजा पिकवला जातो. तेथूनच हा गांजा विक्रीसाठी शहरात येतो. चाकण येथे सापडलेला गांजाही आरोपींनी ओडिशा येथून शहरात आणल्याचे समोर आले. पोलिसांनी केलेल्या कारवाईत गांजाची वाहतूक करणारे हाती लागत असले तरी मुख्य सूत्रधार मात्र मोकाटच असल्याने शहरात गांजा येण्याचे प्रकार सुरूच आहेत.

चार महिन्यांत १ कोटी १४ लाखांचा माल पकडला

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील चार महिन्यांत १ कोटी १४ लाख ४४ हजार ९७३ रुपयांचे अंमली पदार्थ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी ३३ गुन्हे दाखल झाले असून, ५७ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक

गरिबी आणि रोजगार नसल्याने अनेकजण या व्यवसायाकडे वळत असल्याचे दिसून येत. विशेषत: कमी वेेळेत जास्त पैसे मिळतात. या आमिषाने अनेकजण या मार्गाचा वापर करतात; परंतु असे पदार्थ विकणे हा गुन्हा आहे, याची जाणीव त्यांना करून देणे आवश्यक आहे. रोजगार नाही म्हणून जे नागरिक असे व्यवसाय करतात. त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर याविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे.

रोजगार देऊन गांजा विक्रीचे काम

शहरातील काही भागात महिला आणि तरुणांना रोजगार देऊन गांजा विकण्याचे काम दिले जाते. कारवाई झाल्यावर अशांवरच कारवाई करण्यात येते. परंतु या व्यवसायामागील खरा सूत्रधार मोकाटच सुटतो. रोजगार नाही, घरची परिस्थिती हलाखीची आहे, म्हणून काही जण असे काम करतात, असे कारवाईत दिसून आले आहे. काही महिन्यापूर्वी केलेल्या कारवाईत एक वयोवृद्ध व्यक्ती गांजा विकण्याचे काम करीत होता. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. कारवाईमध्ये त्या व्यक्तीची परिस्थिती हालाखीची असल्याचे दिसून आले होते. ती व्यक्ती नाईलाजाने हे काम करीत असल्याचे कारवाईत निदर्शनास आले होते.

Web Title: Cannabis is sold in Pimpri Chinchwad Found by gram gram the main facilitator Mokat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.