महिला वाहतूक पोलिसाशी वाहनचालकाची झटापट; धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 11:09 AM2021-06-10T11:09:43+5:302021-06-10T11:10:14+5:30
आरोपी चारचाकी वाहनातून प्रवास करतेवेळी मास्क न घालता तो मोबाईल फोनवर बोलत असताना गाडी चालवत होता. त्यामुळे त्याला फिर्यादी यांनी थांबवले..
पिंपरी : नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करीत असताना वाहन चालकाने महिलापोलिसाशी झटापट केली. तसेच पोलिसांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा केला म्हणून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. भोसरी येथे बुधवारी (दि. ९) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास हा प्रकार घडला.
मोहित देवेंद्र सिंग (वय २६, सध्या रा. खराबवाडी, चाकण, मूळ रा. जालोन, उत्तर प्रदेश), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याने या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वाहतूक महिला पोलीस आहे. फिर्यादी बुधवारी सायंकाळी भोसरी येथे वाहतूक नियमन करीत असताना आरोपी हा चारचाकी वाहन घेऊन जात होता. त्यावेळी मास्क न घालता तो मोबाईल फोनवर बोलत असताना गाडी चालवत होता. त्यामुळे त्याला फिर्यादी यांनी थांबवले. त्यानंतर ट्रॅफिक वॉर्डन सोहेल पठाण यांना आरोपीच्या गाडीत बसवून सदर गाडी वाहतूक शाखेच्या नाशिक फाटा येथील कार्यालय येथे नेण्यास सांगितली. मात्र आरोपी सिंग याने त्याची गाडी पुणे-नाशिक रस्त्यावरील अंकुशराव लांडगे सभागृह समोर घेऊन गेला. त्यावेळी फिर्यादी यांनी मदतीसाठी नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानंतर भोसरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक रवींद्र चौधरी व भोसरी मार्शल तेथे आले. त्यांनी आरोपीला सरकारी जीपमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने दंगामस्ती केली. तसेच फिर्यादीशी झटापट केली. पोलिसांच्या वाहनाला लाथा मारल्या. पोलिसांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. तसेच पोलिसांशी गैरवर्तन करून सरकारी कामात अडथळा केला. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड तपास करीत आहेत.