शहरात आनंदोत्सवाला सुरवात; रस्ते गेले गर्दीने फुलून, गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 03:12 AM2017-08-26T03:12:41+5:302017-08-26T03:13:11+5:30

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे आज चिंचवडमध्ये मंगलमय वातावरणात आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांत गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

Carnival begins in the city; The streets are packed with densely populated flowers, and there is a market for buying Ganesh idol | शहरात आनंदोत्सवाला सुरवात; रस्ते गेले गर्दीने फुलून, गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

शहरात आनंदोत्सवाला सुरवात; रस्ते गेले गर्दीने फुलून, गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

Next

चिंचवड : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, विघ्नहर्त्या गणरायाचे आज चिंचवडमध्ये मंगलमय वातावरणात आगमन झाले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांत गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी घरातील आबालवृद्ध आणि मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते. आजपासून या आनंद सोहळ्याला सुरुवात झाली.
ढोल, ताशाचा गजर आणि बाप्पाचा जयघोष करीत चिंचवडकरांनी लाडक्या गणरायाचे जल्लोषात स्वागत केले. चिंचवड परिसरात सकाळी पावसाला सुरुवात झाली. मात्र, गणरायाच्या स्वागताचा उत्साह कायम होता.
चिंचवडमधील चापेकर चौक, गांधी पेठ, काकडे पार्क,तानाजीनगर, दळवीनगर, बिजलीनगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन भागातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते.बाजारपेठेत पूजा साहित्य खरेदीसाठीही मोठी गर्दी होती. सार्वजनिक गणेश मंडळांनी ढोल-ताशाच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठा केली. चिंचवडमधील गांधी पेठ तालीम मित्र मंडळ, नवतरुण मित्र मंडळ,संत ज्ञानेश्वर मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, श्री दत्त मित्र मंडळ, उत्कृष्ट मित्र मंडळ, शिवाजी मित्र मंडळ, दळवीनगरातील समता तरुण मित्र मंडळ,समर्थ कॉलनी मित्र मंडळ,चंद्रकांत मित्र मंडक,बाल तरुण मित्र मंडळ, भोईर नगर मित्र मंडळ, नवप्रगती मित्र मंडळ, उद्योगनगर मित्र मंडळ, रॉयल स्पोटर््स क्लब या मंडळांनी ढोल-ताशाच्या गजरात गणेशाचे स्वागत केले. अनेक सोसायटी, कंपनी व घरगुती गणपतींचे स्वागत जल्लोषात करण्यात आले.

लहान मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण
रावेत : रिमझिम पडणारा पाऊस त्यातच बाप्पांच्या आगमनाची सर्वांना लागलेली ओढ आणि होणारा बाप्पांचा जयघोष गणपती बाप्पा मोरया.... आला रे आला गणपती आला....एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, असा जयघोष करीत बच्चे कंपनीसह गणेशभक्तांनी लाडक्या गणेशाला घरी आणण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. लाडक्या बाप्पाचे आनंदी व उत्साही वातावरणात सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे आगमन झाले. मंडळाचे गणपती दुपारनंतर मंडपात आणण्यात आले, तर घरगुती गणपती अगदी सकाळपासूनच घरी आणून मनोभावे पूजा करून मूर्ती स्थापना करण्यात येत होती. गणपतीचे आगमन होणार. त्यामुळे लहान मुलांमध्ये उत्साह दिसून येत होता.

जीएसके शाळेत गणेश आगमन
जाधववाडी : जाधववाडी येथील जीएसके शाळेत गणपतीच्या आगमनाने शाळा परिसरात मोठे उत्साहाचे वातावरण होते़ शाळा परिसर ढोल-ताशांच्या आवाजाने व गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी दुमदुमला. शाळेचे संस्थापक गणेश घोगरे यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. मुख्याध्यापिका रोहिणी गडाख यांनी गणेशोत्सव या सणाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली़

नागरिकांची मोठी गर्दी
रावेत, वाल्हेकरवाडी, शिंदे वस्ती, गुरुद्वारा चौक, बिजलीनगर, चिंतामणी चौक परिसर अगदी भक्तिमय झाल्याचे दिसून येत होते. परिसरात ठिकठिकाणी गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या़ तर पूजेच्या साहित्याची दुकानेही थाटली होती. अनेक वस्तू खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणपती व पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी लहान थोरांनी हार, फुले, केवडा, कमळ, ध्रुवा यांसह विविध पूजेच्या साहित्य खरेदीच्या दुकानामुळे परिसर गजबजून गेला होता. गणपती आगमनाच्या वेळी लहान मुले नाचत, गात, जयजयकार करीत गणपती घरी घेऊन जात होते. अगदी सकाळपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत पूजेचा मुहूर्त असल्याने घरगुती गणपतीची मूर्ती स्थापना अनेकांनी एक वाजण्याच्या अगोदरच करून घेतली.

ढोल-ताशांचा गजर
परिसरात दुपारनंतर ढोल, ताशे, लेझीम यांच्या गजरात गणपती आणण्यासाठी अनेक मंडळांच्या सदस्यांनी गर्दी केली होती. भोंडवे कॉर्नर परिसरातून गणपती खरेदीची झुंबड उडताना दिसून येत होती. काही ठिकाणी गुलालविरहित
मिरवणुका काढल्याचे दिसून येत होते. तर काहींनी पारंपरिक वाद्य वाजवत श्रींचे स्वागत केले. या वर्षी परिसरात डीजेसारख्या वाद्यांना बगल देण्यात आल्याचे दिसून आले. तर रस्त्यावर गर्दी होऊ नये, वाहतुकीला अडथळा होऊ नये, याची दक्षता अनेक मंडळे घेताना दिसून येत होते. महागाई वाढल्याने या वर्षी मूर्तींच्या किमती वाढल्याने अनेकांनी छोट्या गणपतीला पसंती दिली. मूर्ती खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होती.

Web Title: Carnival begins in the city; The streets are packed with densely populated flowers, and there is a market for buying Ganesh idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.