गाजर, मिरची महाग, पालेभाज्या स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 12:49 AM2018-07-23T00:49:50+5:302018-07-23T00:50:19+5:30
मागील आठवड्याच्या तुलनेत गाजर आणि हिरवी मिरचीचे दर वाढले आहेत. आषाढी एकादशीमुळे बाजारात रताळी व भुईमुगाच्या शेंगांचीही आवक वाढली होती.
पिंपरी : येथील लाल बहाद्दूरशास्त्री भाजी मंडईत रविवारी पालेभाज्यांचे दर काही प्रमाणात कमी झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत गाजर आणि हिरवी मिरचीचे दर वाढले आहेत. आषाढी एकादशीमुळे बाजारात रताळी व भुईमुगाच्या शेंगांचीही आवक वाढली होती.
रताळी ४० ते ५० प्रतिकिलो तर भुईमुगाच्या शेंगा ६० ते ७० रुपये किलो दराने विकल्या जात होत्या. बेळगाव येथून मोठ्या प्रमाणात वटाण्याची आवक झाल्यामुळे वटाण्याचे भाव ५० टक्क्यांनी कमी झाले होते. मात्र या आठवड्यात मटारचे भाव थोड्याप्रमाणात वाढून ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. गेल्या आठवड्यात आवक वाढल्यामुळे मटारचे भाव ४० ते ५० रुपये झाले होते. शेवगा, गवार व श्रावणी घेवडा यांचे दर स्थिर होते. त्याचप्रमाणे टोमॅटो, पावटा, वाल यांचे भावात प्रतिकिलो १० रुपयांनी झालेली वाढ या आठवड्यात ही तशीच होती. कोथिंबीर व मेथीची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे त्यांचे भाव कमी झाले होते. कोथिंबीर व मेथी ७ ते ८ रुपये दराने विकली जात होती.
भाज्यां प्रमाणेच फळांचे ही दर तुलनेने कमी झाले आहेत. आंब्याचा हंगाम संपत आल्यामुळे आंब्यांचे दर वाढले आहेत. आंबा १०० रुपये किलो दराने विकले जात होते.
पालेभाज्यांचे भाव पुढीलप्रमाणे:
कोथिंबीर : ७ ते ८, मेथी : ७ ते ८, शेपू : १०, पालक : १०, मुळा : २०, कांदापात : २०, तांदुळजा : १०, पुदिना : ५, चुका : २०.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे :
सफरचंद : १६० ते २००, आंबा : १००, पेरू : ४० ते ८०, सीताफळ : ४० ते १००, पपई : ३० ते ५०, डाळींब : ३० ते १००, मोसंबी : ६०, संत्री : १००, किवी : ६० ते ८० (३ नग), ड्रॅगन फ्रुट : ६० (१ नग), पिअर : १००, १६० (परदेशी).
फळभाज्यांचे किरकोळ विक्रीचे दर (प्रतिकिलो)
बटाटे : २० ते २२, कांदे : २२, टोमॅटो : ३०, गवार : ३५ ते ४०, दोडका : ३५ ते ४०, घोसाळी : ४०, लसूण : ४०, आले : ७०, भेंडी : ४० ते ५०, वांगी : ४०, कोबी : २५ ते ३०, फ्लॉवर : ४०, शेवगा : ५० ते ६०, हिरवी मिरची : ५० ते ६०, शिमला मिरची : ५०, पडवळ : २५ ते ३०, दुधी भोपळा : २५ ते ३०, लाल भोपळा : ४० ते ५०, काकडी : ३० ते ४०, चवळी : ४०, काळा घेवडा : ७०, तोंडली : ४०, गाजर : ५०, वाल : ४०, राजमा : ५० ते ६०, मटार : ७० ते ८०, कारली : ४०, पावटा : ६०, श्रावणी घेवडा : ८०, लिंबू : ४० ते ५० (शेकडा).
उपवासामुळे रताळ्याला मागणी
सांगवी : आषाढी एकादशीनिमित्त उपवासाच्या पदार्थांसह फळांना मागणी वाढली आहे. सांगवीत आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात रविवारी रताळी, बटाटे, भुईमुगाच्या शेंगा आदींना मागणी होती. त्यामुळे त्याचे दरही वधारल्याचे दिसून आले. रताळी ६० रुपये किलो तर भुईमुगाच्या शेंगा ८० रुपये किलो होत्या. फळांचेही दर चढेच होते. केळी ६० रुपये डझन तर सफरचंद प्रतिकिलो २०० रुपये दर होता. दर चढे असले तरी, ग्राहकांकडून या फळांची आणि उपवासाच्या पदार्थांसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यात येत होती. साबुदाणा, वरईचीही खरेदी करण्यात येत होती.