पिंपरी-चिंचवडमध्ये दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त; पोलिसांकडून तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 05:15 PM2022-03-14T17:15:57+5:302022-03-14T17:18:44+5:30
गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी : बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त केली. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि. १२) रात्री साडेआठच्या सुमारास ही कारवाई केली.
राजेश भिकू पडवळ (वय २६, रा. गोऱ्हे, खडकवासला, ता. हवेली), अतिश गोरख गायकवाड (वय २१, रा. ओटा स्कीम, निगडी), ऍनसन उर्फ तंबी ॲन्थेनीपॉल जेवियर (वय २९, रा. साईनगर, मामुर्डी, देहूरोड), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दरोडा विरोधी पथकाचे पोलीस नाईक आशिष बनकर यांनी याप्रकरणी रविवारी (दि. १३) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बेकायदा शस्त्र बाळगत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दरोडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी कारवाई करून आरोपींना पकडले. त्यावेळी आरोपींकडे दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. पोलिसांनी एक लाख १५ हजार २०० रुपये किमतीचे दोन पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे तसेच एक दुचाकी जप्त केली.
दरम्यान, आरोपी अतिश गायकवाड याला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तडीपार आदेशाचे उल्लंघन करून पोलिसांची किंवा शासनाची परवानगी न घेता आरोपी सतीश गायकवाड हा शहरात वावरताना मिळून आला, असे फिर्यादीत नमूद आहे.