Talawade Fire: ‘स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक
By नारायण बडगुजर | Published: December 9, 2023 01:52 PM2023-12-09T13:52:43+5:302023-12-09T13:53:13+5:30
तळवडे येथील ज्योतीबानगर येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेत सहा महिला जखमी तर दहा जण जखमी झाले...
पिंपरी : ‘स्पार्कल कँडल’ बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तळवडे येथील ज्योतीबानगर येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेत सहा महिलांचा मृत्यू तर तर दहा जण जखमी झाले.
शरद सुतार (वय ४०), नजीर अमीर शिकलगार (रा. संतोषी मातानगर, मोहननगर, चिंचवड) यांच्यासह दोन महिलांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांनी याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळवडे येथील ज्योतिबा नगर येथे राणा फॅब्रिकेशन कंपनीच्या आतील बाजूस शिवारज एंटरप्रायजेस कंपनी होती, वाढदिवसाच्या केकसाठीचे ‘स्पार्कल कँडल’ बनविण्याचे काम या कंपनीत केले जात होते. त्यासाठी स्फोटक व ज्वालाग्राही पदार्थाचा वापर बेकायदेशीर व विनापरवाना केला. कंपनीतील कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे कामगारांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतानाही शरद सुतार, नजीर शिकलगार आणि दोन महिला यांनी शिवराज एंटरप्रायजेस ही कंपनी बेकायदेशीर विनापरवाना चालू ठेवून कंपनीतील सहा कामगारांच्रुज्ञ मृत्यूस तसेच १० कामगारांना गंभीर जखमी होण्यास कारणीभूत झाले, असे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी भादंवि कलम ३०४(२), २८५, २८६, ३३७, ३३८ सह द एक्सप्लोजिव्ह ॲक्ट १८८४ कलम ५,९(बी) अन्वये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच याप्रकरणी नजीर अमीर शिकलगार याला पोलिसांनी अटक केली. देहूरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे तपास करीत आहेत.
आगीचे कारण अस्पष्टच...
शिवराज एंटरप्रायजेस या कंपनीत ‘स्पार्कल कँडल’ या शोभेच्या फटाक्यांना आग लागून मोठा स्फोट झाला. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.