सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणी माजी नगरसेवकासह नऊ जणांवर गुन्हा
By नारायण बडगुजर | Published: July 2, 2024 05:35 PM2024-07-02T17:35:02+5:302024-07-02T17:37:14+5:30
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे
पिंपरी : माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तुरुंगात असलेला सराईत गुन्हेगार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्या. त्यानंतर त्याच्यावर हल्ला करून त्याचा खून केला. पुनावळे येथे सोमवारी (दि. १) रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करून माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.
अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले (३४, रा. पुनावळे गावठाण) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अमोल याचा भाऊ समीर उर्फ गोट्या गजानन गोरगले (३२, रा. पुनावळे गावठाण) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शेखर अशोक ओव्हाळ, मुन्ना उर्फ अभिषेक बाळासाहेब ओव्हाळ, रितेश रमेश ओव्हाळ (तिघे रा. पुनावळे), समीर शेख, महेश कदम, गणेश कदम, इतर तीन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल हा सोमवारी रात्री पुनावळे येथील एका हाॅटेलच्या मागच्या बाजूला बसला होता. त्यावेळी संशयितांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांनी अमोल याच्यावर मोठ्या कोयत्याने डोक्यात, पाठीवर वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या अमोल याला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला. गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने पाच संशयिताना ताब्यात घेतले.
पोट निवडणुकीत झाला होता वाद
विधानसभेच्या चिंचवड मतदारसंघासाठी २०२३ मध्ये पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये शेखर ओव्हाळ आणि अमोल गोरगले यांच्यात वाद झाला होता. त्या वादाचा राग मनात धरून अमोल याच्यावर हल्ला करण्यात आला, असे फिर्यादीत नमूद आहे.
हत्येचा कट
माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमोल याच्यासह दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले होते. त्यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली होती. याप्रकरणी अमोल हा तुरुंगात होता. काही दिवसांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.
विधानसभेसाठी इच्छुक...
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकी दरम्यान माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तसेच २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी पिंपरी राखीव मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यावेळी त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर पुन्हा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले होते.