अनिकेत जाधव खून प्रकरणी सोन्या काळभोरसह चौघांना निगडी पोलिसांकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 11:46 AM2017-11-27T11:46:24+5:302017-11-27T12:17:17+5:30
अनिकेत जाधव याचा खून करून पसार झालेल्या काळभोर टोळीच्या प्रमुखासह चौघांना निगडी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री लोणावळा परिसरातून अटक केलीे.
पिंपरी : रावण सेना टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा खून करून पसार झालेल्या काळभोर टोळीच्या प्रमुखासह चौघांना निगडी पोलिसांनी रविवारी मध्यरात्री लोणावळा परिसरातून अटक केलीे. सोन्या काळभोर याच्यावर रावण टोळीच्या गुंडांनी रविवारी रात्री गोळीबार केल्याचे, त्यात दोघे जखमी झाल्याची चर्चा होती. मात्र पोलिसांनी सोन्या काळभोरसह अन्य आरोपींना जेरबंद केले आहे
विवेक सोपान काळभोर उर्फ सोन्या, दत्ता काळभोर, जीवन अंगराज सोनवणे आणि अमित उर्फ बाबा फ्रान्सिस या चौघांना अटक केली आहे. सोमवारी २० नोव्हेंबरला अनिकेत जाधव याच्यावर तलवारीने वार करून तसेच डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून करण्यात आला होता.
एक महिन्यापूर्वी रमाबाई वसाहत आकुर्डी येथे महाकाली टोळीचा प्रमुख हणम्या शिंदे याच्यावर गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न अनिकेत व त्याच्या साथीदाराने केला होता. या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो त्यामध्ये फरार होता.
अनिकेत जाधव याचा खून केला. यामध्ये महाकाली टोळीचा प्रमुख हणम्या शिंदे आणि त्याच्या इतर चार साथीदारांना यापूर्वीच अटक केली आहे. सोन्या काळभोर आणि इतरांची माहिती निगडीचे वरिष्ठ निरीक्षक विजय पळसुले, शंकर अवताडे, तपासी पथकाचे संदीप पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार तपासी पथकाचे अधिकारी, कर्मचारी किशोर पदेर, विलास केकान, प्रसाद कलाटे, किरण खेडकर, रमेश मावस्कर, धर्मा अहिवळे या पथकाने मळवळी परिसरातून सापळा रचून रविवारी अटक केली.