लोणावळ्याच्या नगराध्यक्षांना दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2017 11:25 AM2017-10-06T11:25:35+5:302017-10-06T12:44:11+5:30
लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांना एका भोंदूबाबानं त्यांच्या घरात घुसून केलेली तक्रार मागे घेण्यासाठी शिवीगाळ करत दमदाटी केली होती. सुरेखा जाधव यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळा : लोणावळ्याच्या नगराध्यक्ष सुरेखा जाधव यांना एका भोंदूबाबानं त्यांच्या घरात घुसून केलेली तक्रार मागे घेण्यासाठी शिवीगाळ करत दमदाटी केली होती. सुरेखा जाधव यांनी याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष पिंजण असे या भोंदूबाबाचे नाव असून त्याच्याविरोधात भादंवी कलम 504 व 506 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी या भोंदूबाबानं सुरेखा जाधव यांच्या वळवण येथील घराबाहेर तिरडीचा उतारा ठेवून त्यामध्ये त्यांच्या मृत्यूची वेळ व ठिकाण नमूद केले होते. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर लोणावळ्यात सर्वत्र संतापाची लाट उसळली होती. घडल्या प्रकाराबाबत तक्रार नोंदवण्यासाठी सुरेखा जाधव यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
यानंतर दोन दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरात घुसून पोलिसात केलेली तक्रार मागे घ्या, नाही तर बघून घेऊन, असं सांगत शिविगाळ करत या भोंदूबाबानं त्यांना दमदाटी केली. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी भोंदूबाबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, लोणावळ्यातील दोन जणांनी मला हे कृत्य करायला लावले असल्याचे भोंदूबाबा संतोष पिंजणनं आपल्या जबाबात म्हटले होते. पण आता जबाब बदल त्यानं अन्य तीन जणांनी मला हे करायला लावले असल्याचे सांगितल्यानं पिंजण हा पोलीस प्रशासन व सर्वांची दिशाभूल करत असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे पिंजणनं हे सर्व काही प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलं की कुणी त्याच्याकडून हे करवून घेतले आहे का? या दिशेनं पोलीस प्रशासनाने गांर्भीयानं तपास करत खरा आरोपी जनतेसमोर आणावा, अशी मागणी नगराध्यक्ष सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी केली आहे.