बनावट चावीच्या सहाय्याने एटीएममधून रोकड लंपास; बँकेचा कॅशियरच निघाला मुख्य सूत्रधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 10:16 PM2021-07-24T22:16:14+5:302021-07-24T22:17:29+5:30
भोसरी येथील सेवा विकास बँकेचे एटीएम अज्ञातांनी शनिवारी मध्यरात्री बनावट चावीच्या सहाय्याने उघडून पैसे चोरी केली होती.
पिंपरी : भोसरी येथील सेवा विकास बँकेचे एटीएम अज्ञातांनी बनावट चावीच्या सहाय्याने उघडून पैसे चोरी केली. ही घटना शनिवारी मध्यरात्री दीड वाजता घडली. यातील आरोपींना पोलिसांनी काही तासात अटक केली. या प्रकरणात बँकेचा कॅशियरच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. कॅशियर, बँकेचा शिपाई आणि अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
कॅशियर सचिन शिवाजी सुर्वे, रोहित महादेव गुंजाळ (रा. पिंपरी), आनंद चंद्रकांत मोरे (रा. पिंपरी), रोहित काटे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी अनधिकृतपणे एटीएम उघडून त्यातून पैसे चोरी केली. ही चोरी करत असताना गोपीनाथ पिंडारे या व्यक्तीने आरोपींना हटकले. त्यावेळी आरोपींनी त्यांना मारण्याची भीती घातली आणि चोरटे पळून गेले. बँकेने रिझर्व्ह बँकेचे नियम न पाळल्याबाबत बँकेचे संबंधित अधिकारी आणि अज्ञात दोन चोरट्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी सुरुवातीला एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. एटीएम सेंटरच्या आतील सीसीटीव्ही आणि एटीएमची स्क्रीन चोरट्यांनी फोडली होती. मात्र सेंटरच्या बाहेरील कॅमेऱ्यात एक चोरटा कैद झाला होता. एटीएम फोडण्याच्या पद्धतीवरून यात बँकेतील एखाद्या कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तात्काळ बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यात बँकेचा शिपाई रोहित गुंजाळ या कर्मचाऱ्यावर पोलिसांना संशय आला.
पोलिसांनी रोहित गुंजाळ यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यावेळी त्याने आनंद मोरे आणि रोहित रोकडे अशी मोघम नावे सांगितली. रोहित रोकडे हे त्याने बनावट नाव सांगितले होते. तर आनंद मोरे हा या प्रकरणातील एक आरोपी होता. तोच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. बँकेचा शिपाई रोहित गुंजाळ आणि कॅशियर रोहित काटे यांनी अर्धी रक्कम घेण्याच्या अटीवर एटीएम मशीनचा पासवर्ड आणि एटीएम मशीनची बनावट चावी दुसऱ्या दोन आरोपींना दिली. रोहित काटे याने मागील एक वर्षापासून १० लाख ८० हजार एवढी कॅश एटीएम मध्ये न भरता त्या रकमेची अफरातफर केली होती. त्यानंतर ती रक्कम त्याने २२ जुलै २०२१ रोजी बँकेत चलनाद्वारे जमा केल्याचे काटे याने कागदी घोडे नाचवले होते.
तडीपार आरोपी सचिन सुर्वे आणि आनंद मोरे या दोघांनी एटीएम फोडले होते. घटना उघडकीस आल्यानंतर आपले प्रताप लपवण्यासाठी कॅशियर रोहित काटे याने एटीएम मधून १५ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचे सांगितले. तसा गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र एटीएम मधून ४ लाख ४० हजार एवढीच रक्कम चोरीला गेली होती.