पतीवर जादूटोनाा करत जेवणात टाकली नखं; पत्नीसह सासु-सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल
By रोशन मोरे | Published: October 22, 2023 06:25 PM2023-10-22T18:25:41+5:302023-10-22T18:26:20+5:30
पतीला ‘तू जिथे दिसशील तिथे तुला आम्ही जीवे मारू’ अशी धमकीही दिली
पिंपरी : पतीला पत्नीनेच नखे खायला घातली तसेच जादुटोण्याचे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. पतीने हा प्रकार सासू, सासऱ्यांना सांगितला असता सासू, सासरे आणि अन्य पत्नीच्या माहेरील नातेवाईकांनी पतीला मारहाण केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. २०) मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान काळेवाडी येथे घडला. या प्रकरणी योगेश शिवाजी आपुणे (वय ३३, रा.काळेवाडी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित गोपाळ लिंबराव शिंदे (५५), अनिल गोपाळ शिंदे(२५), अक्षय गोपाळ शिंदे (२३), शिवाजी राऊत (३४, रा.लोणी काळभोर) यांच्यासह तीन महिलांवर गुन्हा दाखल करत अनिल शिंदे याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी योगेश यांचे पत्नीसोबत कौटुंबिक कारणावरून वाद होत होते. त्यानंतर पत्नीने मोहोळ येथील बाबाजी शेख यांच्याशी फोनवर बोलून जादूटोणा करण्याबाबत विचारणा केली. फिर्यादीला जेवणात नखे आणि इतर काही वस्तू खायला देण्याबाबत चर्चा झाल्याचे कॉल रेकॉर्डिंग योगेश यांनी पत्नीच्या मोबाईल मध्ये ऐकले. त्याबाबत त्यांनी सासू-सासरे यांना सांगितले. त्यानंतर सर्व संशयितांनी फिर्यादीस नखे खायला घालून, मायाजाळ नावाची वस्तू व इतर वस्तू पाण्यात मिसळून योगेश यांना खायला दिले. योगेश यांच्या मेव्हणा संशयित अक्षय शिंदे यानी कोयत्याने मारहाण केली. सासूने डोक्यात मिरची पावडर टाकली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस, ‘तू जिथे दिसशील तिथे तुला आम्ही जीवे मारू’ अशी धमकी दिली. योगेश यांच्या पत्नीने ‘जर आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली तर मी आत्महत्या करेन’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.