टाकाऊ वस्तूंपासून ‘ऐतिहासिक महल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:17 AM2017-09-02T01:17:38+5:302017-09-02T01:17:42+5:30
चिंचवड येथील केशवनगर, काकडे पार्कमध्ये असलेल्या भक्ती रेसिडेन्सीत यंदाही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा मंडळाने कागद, लाकूड, थर्माकोल यासारख्या टाकाऊ वस्तूंचा वापर करत ‘ऐतिहासिक महल’ हा देखावा साकारला आहे.
पिंपरी : चिंचवड येथील केशवनगर, काकडे पार्कमध्ये असलेल्या भक्ती रेसिडेन्सीत यंदाही गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदा मंडळाने कागद, लाकूड, थर्माकोल यासारख्या टाकाऊ वस्तूंचा वापर करत ‘ऐतिहासिक महल’ हा देखावा साकारला आहे.
भक्ती रेसिडेन्सीचे गणेशोत्सवाचे यंदाचे दहावे वर्ष आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण रक्षणाचा संदेश समाजात दिला जावा, या उद्देशाने हा देखावा साकारण्यात आला आहे. देखाव्यातील संपूर्ण डिझाईन व इतर कलाकुसर सोसायटीतील कार्यकर्त्यांनी स्वत: केले आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर देखावा तयार करण्यासाठी केला आहे. सोसायटीतील तरुण, लहानमुले यांनी एकत्रितपणे येऊन देखावा साकारला आहे. तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून कलात्मकतेला वाव दिला आहे. सामाजिक भानही या सोसायटीने जपले आहे. सोसायटीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष रितेश भुसारी, उपाध्यक्ष श्रेयस बाबू, खजिनदार अभिजित जाधव, कार्यकर्ते निखिल जाधव, विवेक पालांडे यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या उद्देशाने रक्तदान व दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरासाठी विद्याश्री चॅरिटेबल ट्रस्ट तर दंतचिकित्सा शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटील दंत महाविद्यालयाचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिरात ५६ बाटल्या रक्त संकलित झाले. त्याचप्रमाणे दंतचिकित्सा शिबिरात एकशे तीस जणांची तपासणी करण्यात आली.